
सिंधुदुर्ग : जिल्हापरिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रवींद्र खेबुडकर यांची नियुक्ती झाली असून सोमवारी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, यांनी त्यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. तसेच यावेळी जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेच्या प्रलंबित कामांबाबत व ठेकेदारांच्या बिलाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्याशी चर्चा करण्यात अली. एप्रिल व मे महिन्यामध्ये लोकांना पाणी टंचाई भासत असून जलजीवनची कामे पूर्ण झाल्यास नागरिकांची पाण्याची समस्या सुटू शकते त्यामुळे जलजीवन मिशन योजनेच्या कामांचा आपण तालुकावार आढावा बैठक घेऊन लवकरात लवकर कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी वैभव नाईक यांनी केली त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.