ठाकरे शिवसेनेनं केला महायुती सरकारचा निषेध

ठेकेदारांची बिले देत नसल्याचा आरोप
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: July 25, 2025 14:14 PM
views 254  views

कणकवली : सत्ताधारी तुपाशी ठेकेदार उपाशी, या महायुती सरकारचे करायचे काय?  अशा घोषणा देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शुक्रवारी कणकवली सार्वजनिक बांधकाम उप अभियंता कार्यालयाच्या बाहेर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी सांगली येथील ठेकेदार हर्षल पाटील यांचे कामाचे पैसे मिळाले नसल्याने त्यांनी आत्महत्या केल्या बाबत त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच सिंधुदुर्ग असे हर्षल पाटील होऊ नये यासाठी हे आंदोलन असल्याची माहिती यावेळी माजी आमदार वैभव नाईक व कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी दिली. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामांची बिले थकलेल्या ठेकेदारांचे समुपदेशन तत्कालीन कार्यकारी अभियंता सर्वगोड यांना करायला सांगा असा टोला देखील यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी लगावला.

कणकवली उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत हर्षल पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करणारा बॅनर लावून शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन छेडण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ठेकेदारांची कोट्यावधी रुपयांची बिले शासन द्यायचे असून सत्ताधारी केवळ आश्वासन देतात. मात्र ठेकेदार देशोधडीला लागले असल्याचा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला. तसेच आमच्या पक्षात या मग बिले देतो असे सांगून पक्षात गेलेले ठेकेदार देखील अजून ताटकळतच असल्याचा टोला त्यांनी लगावला. तर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी केवळ आश्वासने देणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी या ठेकेदारांचे पैसे मिळवून द्यावेत व सिंधुदुर्गात हर्षल पाटील सारखी घटना टाळावी असे आवाहन देखील शासनाला केले. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, राजू शेट्ये, राजू राणे, ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री, राजू राठोड, तेजस राणे, युवासेना विभाग प्रमुख गुरु पेडणेकर, उद्धव पारकर, लक्ष्मण हन्नीकोळ, माधवी दळवी, तात्या निकम, जयेश धुमाळे, ललित घाडीगावकर, रुपेश आमरोसकर, विलास गुडेकर आदी उपस्थित होते.