ठाकरे सेनेने जिल्ह्यात भाजपला दिली 'काटे की टक्कर'

शिंदे शिवसेनेला खातेही नाही आलं उघडता
Edited by: भरत केसरकर
Published on: November 06, 2023 17:02 PM
views 239  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 23 ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. भाजप- १५, शिवसेना शिंदे गट- ०, ठाकरे शिवसेना -६,अजित पवार गट-०, शरद पवार गट- ०, काँग्रेस- ०,इतर- ३ अशा पद्धतीने पक्षीय बलाबल राहिले आहे. एकूण निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती २३ होत्या आणि एक बिनविरोध झाली आहे. दिपक केसरकर यांना दोडामार्ग आणी वेंगुर्ल्यात खातेही खोलता आले नाही. तर शिवसेना पक्षाला एकही ग्रामपंचायत ताब्यात न आल्याने नामुष्कीची वेळ आली आहे.

 कुडाळात वैभव नाईकांना धक्का

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील  पाच पैकी दोन ग्रामपंचायतीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने वर्चस्व मिळवले. तर भाजपने दोन ग्रामपंचायतीवर कब्जा मिळवला आहे.तर बहुचर्चित हुमरमळा अणाव ही एक ग्रामपंचायत ही गाव पॅनलकडे गेली आहे.तर मालवण तालुक्यातील आचरा ही प्रतिष्ठेची समजली जाणारी ग्रामपंचायत भाजपने एक हाती मिळविली आहे.त्यामुळे कुडाळ मालवण मतदार मतदारसंघातील सहापैकी तीन ग्रामपंचायती भाजपकडे,दोन ग्रामपंचायती ठाकरे शिवसेनेकडे तर एक ग्रामपंचायत गाव पॅनलकडे गेली आहे.कुडाळ तालुक्यातील भडगाव ग्रामपंचायतीवर विजय मिळवत भाजपने आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का दिला आहे.

मालवणातील आचरात निलेश राणेंचा करिष्मा

मालवण तालुक्यातील एकमेव आचरा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे  भाजपचे जेराॅन फर्नांडिस निवडून आले असून भाजपाने या ठिकाणी सर्व जागावर विजय मिळवत आमदार वैभव नाईक यांना धक्का दिला आहे.निलेश राणेंनी करिष्मा करत उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दिपक केसरकर यांना मोठा धक्का

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दोडामार्ग मध्ये तीन ग्रामपंचायतीसाठी आणि वेंगुर्ले मध्ये चार ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी झाली. यापैकी वेंगुर्ले मधील चार पैकी तीन ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व मिळवला आहे.तर एका ग्रामपंचायतीवर उद्धव ठाकरे गटाच्या सेनेने वर्चस्व मिळवला आहे. दोडामार्ग मध्ये तीन पैकी भारतीय जनता पक्षाने एक तर ग्राम विकास आघाडीने दोन ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले आहे. या मतदार संघातील एकूण सात पैकी चार ग्रामपंचायती भारतीय जनता पक्षाकडे एक ग्रामपंचायत उद्धव ठाकरे शिवसेनेकडे तर दोन ग्रामपंचायत या ग्रामविकास आघाडीकडे गेल्या आहेत. या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भोपळा सुद्धा फोडता आलेला नाही. त्यामुळे हा दीपक केसरकर यांना धक्का मानला जात आहे.

कणकवलीत भाजपची मुसंडी,पण बेळणे उबाठाकडे

कणकवलीत तालुक्यातील बेळणे ग्रामपंचायत ठाकरे गटाकडे गेली आहे. ही निवडणूक नितेश राणे यांनी प्रतिष्ठेची केली होती.या ठीकाणी पुर्वी भाजपची सत्ता होती. मात्र ठाकरे शिवसेनेने या ठीकाणी मोठा विजय मिळवत नितेश राणेंना धक्का दिला आहे. यावेळी विजयी सरपंच व सदस्यानी कणकवलीत आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी दाखल होत एकच जल्लोष केला. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

देवगडात नितेश राणे फॅक्टर

कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघातील देवगड आणि कणकवली मधील अकरापैकी आठ ग्रामपंचायती भाजपाने तर दोन ग्रामपंचायती ठाकरे सेनेने तर एक ग्रामपंचायत ग्रामविकास आघाडीने मिळवली आहे. या मतदारसंघात नितेश राणेंचं वर्चस्व कायम राहिल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र कणकवली तालुक्यातील प्रतिष्ठेची बेळणे ग्रामपंचायत भाजप कडून ठाकरे सेनेने हिसकावून घेतली आहे.