ठाकरे सेनेकडून 'त्या' निर्णयाचा निषेध...!

Edited by:
Published on: January 11, 2024 14:09 PM
views 244  views

कुडाळ : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी  एकनाथ शिंदे यांच्या गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली. मात्र, या निकालावर ठाकरे गटाने काळ्या फिती बांधून नाराजी दर्शवित गुरुवारी कुडाळ उबाठा पक्ष कार्यालया समोर  निषेध व्यक्त केला. यावेळी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते म्हणाले की, काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिला तो चुकीचा आहे. आमचीच शिवसेना ही मूळ असून या निकालाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. सर्वोच्च न्यायालयात आमचा नक्कीच विजय होईल असा विश्वास जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी व्यक्त केला.

संविधानाची ही पायमल्ली असून देश आता हुकूमशाहीकडे चालेला आहे. नार्वेकर यांनी भाजपच्या दबावाखाली येऊन हा निर्णय दिला आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. २०१८ मध्ये उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मान्यता देण्यात आली. त्यांनीच आत्ताच्या शिंदे गटाच्या आमदारांना एबी फॉर्म दिले होते. हे ते विसरले आहेत. एकंदरीत राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिला तो आमच्या विरोधात असला तरी आता जनतेच्या कोर्टात आम्हाला नक्कीच न्याय मिळेल. असेही जिल्हाप्रमुख संजय पडते म्हणाले.

यावेळी उपनेत्या जान्हवी सावंत यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडताना म्हटले की, शिंदे सरकार आणि राहुल नार्वेकर जिंकले आहेत. आमदार पात्र ठरलेत आणि संविधान अपात्र ठरले आहे. मोदी आणि शहांचे घाणेरडे रूप संपूर्ण जनता बघते आहे. आम्हाला हा निकाल शिंदे गटाकडूनच लागणार याची माहिती होती. त्यामुळे निर्णयाचा आम्ही निषेधच करतो असे जान्हवी सावंत यांनी सांगितले. तर तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी सुद्धा शिंदे गटावर टीकास्त्र सोडताना म्हटले की, शिंदे गटाने जो आनंदोत्सव साजरा केला तो लुळापांगळा आहे. शिंदे गटाने कुडाळ - मालवणची आमदारकीची उमेदवारी आणि खासदारकीची उमेदवारी मिळवून दाखवावी आणि विजय मिळवून दाखवावा तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी शिंदे गटाला खुले आव्हान दिले.