उमेदवारी घेणारे पक्ष संघटनेकडे लक्ष देत नाही : अरुण दुधवडकर

Edited by: विनायक गांवस
Published on: May 14, 2025 19:12 PM
views 25  views

सावंतवाडी : पक्ष ज्यांना उमेदवारी देते ते पक्ष संघटनेकडे लक्ष देत नाहीत. निवडून आले तरी आणि पराभूत झाले तरीही. त्यामुळे यापुढे पदाधिकाऱ्यांना बळ देण्याकरिता थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सावंतवाडी तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची लवकरच भेट घालून देणार असल्याचे सांगून आगामी होणाऱ्या विधानसभेच्या मिनी निवडणुका म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये एकत्र येऊन काम करा आणि या निवडणुकीमध्ये विजय संपादन करा असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपनेते आणि जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी केले. ते सावंतवाडी माजगाव येथील सिद्धिविनायक सभागृहामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर कार्यक्रमात बोलत होते.

सावंतवाडी तालुका संपर्कप्रमुख राजू नाईक यांनी ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते.. 

यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख कालिदास कांदळगावकर जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी सावंतवाडी तालुकाप्रमुख राजू नाईक,सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ सावंतवाडी तालुकाप्रमुख मायकल डिसूजा दोडा मार्ग तालुकाप्रमुख संजय गवस वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब जिल्हा महिला संघटिका श्रेया परब उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार शब्बीर मणियार सावंतवाडी तालुका महिला संघटक भारतीय कासार नम्रता झारापकर शहर महिला संघटक श्रुतिका दळवी सावंतवाडी शहर प्रमुख शैलेश गवंडळकर आदींसह विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख उपस्थित होते. 

श्री. दुधवडकर पुढे म्हणाले, नवीन नेतृत्व तयार करून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत आपण आपली ताकद दाखवून द्यावी लागेल‌. आगामी येणाऱ्या मनपा निवडणुकीमध्ये मुंबई मनपा हा शिवसेनेचा प्राण आहे. कोणत्याही परिस्थितीत ही मनपा जिंकायला हवी त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजेच मिनी विधानसभा सुद्धा जिंकणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तर लोकसभेत आणि विधानसभेत झालेला पराभव म्हणजे सगळे संपले असे नव्हे, तर हार जीत होत असते‌. शिवसेनेने असे अनेक पराभव पचवले आहेत‌. विजयही मिळवलेले आहेत. त्यामुळे मतभेद गाडून पक्षप्रमुखांना आपली ताकद दाखवून द्या  कट्टर शिवसैनिकाने आता एकत्र येऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुका लढून जिंकाव्यात असे आवाहन केले. आमदार विकले गेले असले तरी सर्वसामान्य जनता पैसे घेऊन मतदान करणारी कोकणची जनता नाही. त्यामुळे शिवसैनिकांनी त्यांच्याशी सतत संपर्कात राहून त्यांचे प्रश्न सोडवावेत, बाळासाहेबांचा शिवसैनिक कसा आहे हे दाखवून देण्याची गरज आहे.


मागील लोकसभा, विधानसभा निवडणुकीसंदर्भात आत्मचिंतन आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मिनी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवणे आणि कार्यकर्त्यांत उर्जा वाढवावी यासाठी या शिबिरात चर्चा झाली. कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून पुन्हा कामावर लागावे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणाऱ्या शिकवणीचा अंगीकार करून काम करावे पैशासाठी काम करणारा शिवसैनिक होऊ शकत नाही तिकडे कंत्राट कामे मिळण्याचा ओघ संपला की सत्तेकडे जाणारा कामे घेणारा शिवसैनिक होऊ शकत नाही तर आदर्श शिवसैनिक कसा असावा याबाबतचे मार्गदर्शन आपल्या प्रास्ताविकात तालुका संपर्कप्रमुख राजू नाईक यांनी केले.

निवडणुका आल्या की कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. लोकसभेपर्यत उत्साह होता. मात्र त्यानंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये तसा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसला नाही. त्यामुळे ही आलेली मरगळ दूर करावी लागेल. विधानसभा निवडणूकीत  पराभवाचा सामना का करावा लागला. याचे आत्मचिंतन होण्याची गरज यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. जे उमेदवार दिले त्यापैकी कोण राहिलेत ?कोणी नाही.कार्यकर्ते एकाकी पडले असल्याची भावना यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यानी व्यक्त केली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवार देण्यासाठी आता पासूनच तयारी सुरू करायला हवी. असेही मत यावेळी युवक प्रमुखांनी मांडले 

तर निष्ठावंत पदाधिकारी कुठेही गेलेले नाही परिस्थिती जरी बिकट असली तरी संघटनेने कार्यकर्त्याला बळ द्यायला हवे आणि यापुढे विविध विधायक कार्यक्रम घेणे सुरूच ठेवावे  असे मत विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ यांनी व्यक्त केले. तर महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी उद्योगाचे शिबिर येत्या 21 मे रोजी जिल्ह्यात आयोजित केले जाणार असून या शिबिरामध्ये महिला नेत्या ज्योती ठाकरे या मार्गदर्शन करणार आहेत तरी याचा लाभ शिवसेनेच्या महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा संघटिका श्रेया परब यांनी केले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख कालिदास कोळंबकर यांनी संघटना वाढीसाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले तर या पुढील उमेदवार हा स्थानिकच असेल यासाठी आपल्या भावना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पर्यंत पोहोचवणार असल्याचे सांगितले. 

जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी संघटनेचे नुकसान टाळण्यासाठी नवं नेतृत्व निर्माण करून जिल्हा परिषद मतदार संघ निवडणूक लढू आणि जिंकू ही. काही वेळा उमेदवारांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे कार्यकर्ते नाराज होत असल्याबद्दलची भावना व्यक्त केली.