देवगड इथं मासेमारी नौकांसाठी पर्यायी इंधनाच्या चाचण्या यशस्वी..!

महाराष्ट्रातील पहिला प्रयोग
Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 23, 2023 18:15 PM
views 138  views

देवगड : मच्छीमाराचा इंधनावरील खर्च कमी व्हावा यासाठी एलपीजी म्हणजेच गॅसवर चालणाऱ्या नौका इंजिनाची (आऊट बोट मशीन) चाचणी नुकतीच मत्स्य व्यवसाय विभागाकडून देवगड या ठिकाणी घेण्यात आली. या दोन्ही चाचण्या अतिशय यशस्वी झाल्या असून लवकरच सद्यस्थितीत वापरत असलेल्या पेट्रोल अथवा केरोसीन इंजिनाचे रूपांतर एलपीजी तसेच सीएनजी मध्ये करण्यासाठीचे तंत्रज्ञान सर्वसामान्य मच्छीमाराला कमीत कमी किमतीत उपलब्ध होणार आहे, अशी माहिती नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य रविकिरण तोरसकर यांनी दिली आहे.

मत्स्य व्यवसायामध्ये मासेमारी नौकमध्ये वापरले जाणारे इंधन ,त्यांची किंमत आणि क्षमता ही खूप महत्त्वाची असते. सध्या स्थितीचा विचार करता मासेमारी नौकांमध्ये पेट्रोल व डिझेल हे दोन इंधनाचे पर्याय वापरले जातात. त्याचबरोबर इंधनाचे अनिश्चित आणि वाढते दर हे सर्व प्रकारच्या मत्स्य व्यवसायिकांना व्यवसाय करण्यास त्रासदायक ठरत आहेत. इंधनावर मोठा खर्च होत असल्यामुळे नफ्याचे प्रमाण कमी होत आहे. तसेच पेट्रोल व डिझेल या इंधनामुळे सागरी पर्यावरण प्रदूषण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मच्छीमाराचा इंधनावरील खर्च कमी व्हावा तसेच सागरी पर्यावरणाचा संतुलन रहावे या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने २०१६ पासून मत्स्यव्यवसाय मध्ये पर्यायी इंधना बाबत संशोधन सुरू केले होते. पर्यायी इंधनांमध्ये एलपीजी, सीएनजी, इथेनोल,मिथेनॉल अशा विविध पर्यायांचा समावेश आहे. यापैकी एलपीजी गॅसवर चालणाऱ्या इंजिनाबाबत माहिती देण्यासाठी दि. २१ व २२ देवगड येथील विठ्ठल रखुमाई मंदिर आनंदवाडी या ठिकाणी कार्यशाळा तसेच प्रात्यक्षिक दाखवण्यात आली. यामध्ये आऊट बोट धारक नौकांना सदरचे गॅसवरील इंजिन लावून समुद्रामध्ये विविध प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्या अत्यंत यशस्वी झाल्या असून स्थानिक मच्छीमारांनी सुद्धा पर्यायी इंधन म्हणून गॅस वापराबाबत समाधान व्यक्त केले आहे. या तंत्रज्ञानासाठी शासकीय योजनातून मच्छीमारांना अनुदान मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रस्ताव सादर करणार असल्याचे सहाय्यक मत्स्य आयुक्त श्री. अलगिरी यांनी यावेळी सांगितल्याची माहिती रविकिरण तोरसकर यांनी दिली आहे. तसेच प्रायोगिक तत्त्वावर गॅस वर चालणारी पाच इंजिने प्रति तालुका मासेमारी व पर्यटन व्यवसायिकांना देण्याची मागणी उपस्थित मच्छिमार यांनी केली. यावर कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अशा प्रकारच्या पर्यायी इंधनाचा वापर केरळ येथील कोलम बीचवर होत आहे. मासेमारी नौका मध्ये पर्यायी इंधनाचा वापर आणि त्याच्या चाचण्या महाराष्ट्र किनारपट्टीवर मालवण येथे प्रथमच करण्यात आल्या. पुणे येथील अनुभवी आणि सन १९४८ साल पासून कार्यरत असलेल्या वनाज या कंपनीमार्फत सदरची चाचण्या यशस्वीरित्या पार पडण्यात आल्या.

या चाचण्यांसाठी मालवण येथील रामेश्वर सोसायटीचे अध्यक्ष जगदीश खराडे, लिओ काळसेकर तसेच देवगड येथील अप्पा खवळे तसेच इतर मच्छीमारांनी सहकार्य केले. यावेळी मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कोल्हे, मत्स्य व्यवसाय अधिकारी तेजस्विता करंगुटकर, तसेच वनाज कंपनीचे सेल्स व मार्केटिंग मॅनेजर अरविंद पाटील, श्री. गुरव, श्री. भुजबळ, हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे श्री. निखिल यांनी तसेच देवगड येथील परवाना अधिकारी श्री. मालवणकर यांनी उपस्थित मच्छीमार यांना मार्गदर्शन केले. यावेळी देवगड येथे संजय बांदकर, दिनेश मोसम, प्रदीप कोयंडे, गुरुनाथ तारी, पिंकू कुबल, दत्ता कोयडे, रत्नाकर प्रभू व इतर मच्छीमार सहकारी संस्था अध्यक्ष, प्रतिनिधी, मच्छीमार, सागर मित्र, सागरी सुरक्षा रक्षक उपस्थित होते.

नीलक्रांती संस्थेतर्फे मेरीटाईम बोर्ड यांना सोबत घेऊन लवकरच सदरची चाचणी ही पर्यटन व्यवसायात वापरात येणाऱ्या नौकासाठी घेण्यात येणार आहे. मासेमारी तसेच पर्यटन व्यवसायात कार्यरत असलेल्या नौका साठी पर्यायी इंधनाबाबत निलक्रांती कृषी व मत्स्य पर्यटन संस्था गेले सहा महिने विविध प्रयोग व अभ्यास पुणे येथील डेकाग्रीन या कंपनीबरोबर करीत होती. या पर्यायी इंधनाच्या चाचण्या यशस्वी झाल्यामुळे मासेमारी व पर्यटन क्षेत्राला इंधन दरवाढीतून दिलासा मिळणार असून सागरी पर्यावरण प्रदूषणात पण घट होणार आहे. एलपीजी व सीएनजी वापरासाठी केंद्र सरकारच्या प्राथमिक परवानग्या मिळालेल्या असुन लवकरात पर्यायी इंधन म्हणुन मासेमारी व्यवसायात दैनंदिन वापरात येण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे, असे रविकिरण तोरसकर यांनी सांगितले.