
रत्नागिरी : नाणीज येथील रहिवासी संजय मधुकर वाईरकर (वय ५२) यांचे १२ ऑगस्ट २०२५ रोजी निधन झाले. ऑगस्ट २०१६ पासून त्यांना मूत्रपिंडाचा (किडनी) विकार होता. किडनी निकामी झाल्याने त्यांचे डायलिसिस सुरू होते. जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज यांच्या प्रेरणेने आणि कै. वाईरकर यांच्या इच्छेनुसार, त्यांच्या नातेवाईकांनी व स्व-स्वरूप संप्रदायाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पार्थिव शरीर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला देहदान केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हे दहावे देहदान आहे.
जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिण पीठ-नाणीजधाम रामानंदाचार्य संप्रदायामार्फत जिल्ह्यातून हे तिसरे देहदान आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सादिकअली सय्यद यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने हे देहदान स्वीकारले. या पथकात डॉ. योगिता कांबळे, डॉ. मंजुळा रावळ, समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव, लिपिक पूर्वा तोडणकर, प्रयोगशाळा सहाय्यक भूमी पारकर, शिपाई मिथिलेश मुरकर आणि मिहिर लोंढे यांचा समावेश होता.
दिवंगत वाईरकर यांचे पार्थिव शरीर सुपूर्द करताना त्यांची पत्नी स्नेहल वाईरकर, मुली तनया आणि पूजा संजय वाईरकर, बहिणी, भाऊ तसेच संप्रदायातर्फे पदाधिकारी संदीप नार्वेकर, तालुकाध्यक्ष अनिता जाधव, डॉ. रवींद्र केसरकर, स्नेहल साळवी, विशेष कार्यवाहक प्रजापती नेत्रा कामत,रत्नागिरी जिल्हा युवक अध्यक्ष गोरक्ष साळवी, प्रवीण ठाकूरदेसाई, निखिल जाधव, श्रीकृष्ण तुपे व ज.न.म.संस्थान कर्मचारी आदी उपस्थित होते.