उडान महोत्सवात सर्जनशील लेखन स्पर्धेत तेजस्वी राणे द्वितीय

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 06, 2025 17:08 PM
views 206  views

देवगड : मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग यांच्या वतीने देवगड शिक्षण विकास मंडळ संचलित श्री.स.ह.केळकर महाविद्यालय, देवगड येथे मंगळवार दिनांक ०४फेब्रुवारी २०२५रोजी  "उडान महोत्सव २०२५" चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ महाविद्यालयानीं सहभाग घेतला होता. पथनाट्य स्पर्धा, सर्जनशील लेखन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि पोस्टर मेकिंग स्पर्धा अशा विविध जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आपल्या महाविद्यालयातून सर्जनशील लेखन स्पर्धा आणि पोस्टर मेकिंग स्पर्धा या दोन स्पर्धा प्रकारात विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. त्यापैकी सर्जनशील लेखन स्पर्धा प्रकारात तृतीय वर्ष वाणिज्य मधील विद्यार्थिनी कुमारी तेजस्वी रवींद्र राणे हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.  मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे समन्वयक डॉ.कुणाल जाधव यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन या विद्यार्थिनीला गौरविण्यात आले . यावेळी व्यासपीठावर  श्री स.ह केळकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार कुन्नूरे ,उपप्राचार्य डॉ. सुरवसे. विभागाचे सर्व जिल्हा समन्वयक  उपस्थित होते.

तेजस्वी राणे हिच्या या नेत्र दीपक यशासाठी महाविद्यालयाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका सुगंधा पवार यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाचे  शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे संस्थाध्यक्ष  अरुण कर्ले, महाविद्यालयाचे  चेअरमन  संभाजी साटम, सर्व संस्था पदाधिकारी, संचालक, प्राचार्य तारी , व इतर सर्व प्राध्यापक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.