
वैभववाडी : वैभववाडी तालुक्यात वाढत्या मानसिक ताणतणाव व नैराश्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या एक-दोन महिन्यांत तालुक्यात अशा घटनांमध्ये वाढ झाल्याने सामाजिक स्तरावरही चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर वैभववाडी येथील दत्तकृपा प्रतिष्ठान यांच्या वतीने ताणतणाव, नैराश्य व त्यावरील उपाय यासंदर्भात जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे व्याख्यान उद्या मंगळवारी (ता. १३) सकाळी ११ वाजता वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालयाच्या सभागृहात होणार आहे.
या व्याख्यानात केईएम रुग्णालय, मुंबई येथील मानसोपचार तज्ञ डॉ. प्रतीक लाड व डॉ. राहुल पेंढारी हे मानसिक ताणतणाव, नैराश्याची कारणे, त्यावर मात करण्याचे मार्ग तसेच मानसिक संतुलन कसे टिकवावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. मानसिक ताणतणावामुळे आत्महत्येचा विचारही कुणाच्या मनात येऊ नये, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. सध्याच्या तणावपूर्ण वातावरणात मानसिक आरोग्य हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून, या व्याख्यानाचा लाभ तालुक्यातील सर्व नागरिक, व्यापारी, विद्यार्थी व पालकांनी घ्यावा, असे आवाहन दत्तकृपा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.










