
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात वेत्ये सोनुर्ली येथे सुरू असलेल्या बेकायदा काळ्या दगड उत्खननामुळे शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसत असल्याचा आरोप करत निगुडे (ता. सावंतवाडी) येथील सामाजिक कार्यकर्ते महेश सावंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. उत्खननासंदर्भातील अटी व शर्तींचे सर्रास उल्लंघन होत असतानाही प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये, सोनुर्ली परिसरासह विविध भागांत काळ्या दगडाचे उत्खनन मोठ्या सुरू आहे. मात्र हे तहसीलदार सावंतवाडी यांनी ठरवून दिलेल्या अटी व शर्तींचे पालन न करता मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात येत असल्याचा दावा उपोषणकर्त्यांनी केला आहे. यामुळे शासनाच्या तिजोरीला कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
वेत्ये येथील खाण क्रमांक ११/१२ हे याचे ठळक उदाहरण असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. मागील तीन वर्षांत सुमारे १५०० ब्रास उत्खननास परवानगी असताना प्रत्यक्षात सुमारे ४००० ब्रासपेक्षा अधिक काळ्या दगडाचे उत्खनन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच सदर खाणीवर स्थगिती आदेश असतानाही रॉयल्टी, दंड व व्याज वसूल न करता उत्खनन सुरू असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
त्यामुळे वेत्ये, सोनुर्लीसह तालुक्यातील इतर सर्व काळ्या दगडाच्या खाणींची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच शासनाच्या नुकसानीची वसुली करावी, अशी प्रमुख मागणी उपोषणकर्ते महेश सावंत यांनी केली आहे. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास उपोषण तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.










