
सावंतवाडी : जिल्हाभर पायी चालत फिरणारा दत्त भक्त म्हणून ओळख असलेला तेजस खटावकर ( रा. आकेरी, वय ३०) याचे आज पहाटे निधन झाले. राहत्या घरी त्याने अखेरचा श्वास घेतला. झोपेत असतानाच त्याला मृत्यूने गाठले.
तेजस हा मनमिळावू स्वभावाचा होता. शहरात अगरबत्ती विकून तो आपला उदरनिर्वाह चालवत होता. दत्त भक्त म्हणून तो परिचित होता. शहरासह तालुक्यातील धार्मिक कार्यक्रमांत त्याची उपस्थिती असायची. गुरूवारी माणगाव दत्त मंदिर येथे तो जात असे. विशेष म्हणजे तो सर्वत्र पायी भ्रमण करायचा. ओळखीच्या प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस करत असे. आज पहाटे राहत्या घरी त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या पश्चात आई,वडील, भाऊ असा परिवार आहे. येथील उपरलकर स्मशानभूमीत त्याच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.











