सातोसेत ‘खेळ पैठणीचा – सन्मान नारी शक्तीचा’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आर्वी धुरी विजेत्या
Edited by:
Published on: March 11, 2026 18:21 PM
views 27  views

बांदा : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सातोसे येथे महिला ग्रुप सातोसे व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘खेळ पैठणीचा – सन्मान नारी शक्तीचा’ या स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. महिलांच्या मोठ्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर, पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ये, सरपंच प्रतीक्षा मांजरेकर, उपसरपंच रुपेश साळगावकर, माजी सरपंच मदन सातोसकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष वसंत धुरी, ग्रामपंचायत सदस्या शुभदा गवंडी व संपदा धुरी, मुख्याध्यापिका सीमा पंडित तसेच बक्षीस प्रायोजक भरत पेडणेकर, चिरायू मांजरेकर आणि वीणा बर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आयोजित या स्पर्धेला गावातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध फेऱ्यांमधून रंगलेल्या या स्पर्धेत सहभागी महिलांनी आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली.

स्पर्धेत आर्वी धुरी यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर शामल नागवेकर व तनुजा गडेकर यांनी उपविजेतेपद मिळवले. विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते पैठणी साडी देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  जे. डी. पाटील यांनी केले. सहकारी शिक्षक आशिष तांदुळे व सातोसे नं. १ शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा पंडित यांचेही कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले.

यावेळी महिला दिनाचे महत्त्व अधोरेखित करत महिलांच्या कष्ट, जिद्द आणि समाजातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सरपंच प्रतीक्षा मांजरेकर, ग्रामपंचायत सदस्य, महिला मंडळ, बचतगट तसेच ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.