आंबा-काजू बागायतदारांना मोठा दिलासा !

जिल्हा बँकेकडून २% अतिरिक्त व्याज सवलत : अध्यक्ष मनीष दळवी
Edited by:
Published on: March 11, 2026 18:58 PM
views 96  views

सिंधुदुर्गनगरी : यंदाच्या हंगामात अवकाळी पाऊस, दाट धुके तसेच खार-दव अशा हवामानातील बदलांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आंबा-काजू पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजदरात अतिरिक्त २ टक्के सवलत देण्याचा हा निर्णय आहे. अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.

जिल्ह्यातील आंबा व काजू या नगदी पिकांसाठी बँकेमार्फत सुमारे ११० कोटी रुपयांचे शेती कर्ज वितरित केले जाते. चालू हंगामातील नैसर्गिक आपत्ती लक्षात घेऊन सन २०२५-२६ या पीक हंगामात विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत किंवा थेट बँकेकडून बागायती पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी ३० जून २०२६ पर्यंत कर्जाची नियमित परतफेड केल्यास त्यांना कर्जावरील नियमित व्याजदरात २ टक्के अतिरिक्त सवलत दिली जाणार आहे. या योजनेतून ८,२८० शेतकऱ्यांना सुमारे २ कोटी रुपयांपर्यंतचा आर्थिक लाभ बँकेच्या नफ्यातून देण्यात येणार आहे. हा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

यासोबतच २०२६-२७ हंगामासाठी आंबा व काजू पिकांच्या कर्ज मर्यादेतही वाढ करण्यात येणार आहे. आंबा पिकासाठी प्रति हेक्टर कर्ज मर्यादा ५० हजारांनी वाढवून सुमारे २ लाख ७५ हजार रुपये, तर काजू पिकासाठी २५ हजारांनी वाढ करून सुमारे २ लाख रुपये कर्ज उपलब्ध होणार आहे. या वाढीव मर्यादेमुळे आंब्यासाठी सुमारे ३० कोटी, तर काजूसाठी १० कोटी, असे मिळून ४० कोटी रुपयांचा अतिरिक्त कर्जपुरवठा होणार आहे.

जिल्ह्यात आंबा पिकाची लागवड अनेक ठिकाणी करार पद्धतीने केली जाते. त्यामुळे स्वतःच्या लागवडीबरोबरच करार पद्धतीच्या कलमांसाठीही बँकेकडून चालू वर्षापासून कर्जपुरवठा करण्यात येणार असून त्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

तसेच ३ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी ३ टक्के, म्हणजे एकूण ६ टक्के व्याज सवलत मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना हे कर्ज ० टक्के व्याजदराने उपलब्ध होते. त्यावर जिल्हा बँकेकडून देण्यात येणाऱ्या २ टक्के अतिरिक्त सवलतीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.