
सावंतवाडी : माडखोल धरण ओव्हर फ्लो झाले आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील गावात पूरपरिस्थिती निर्माण होण्याच्या शक्यतेने तहसीलदार श्रीधर पाटील यांच्यासह प्रशासनानं त्या ठिकाणासह परिसरातील गावांची पाहणी केली. तसेच खबरदारी घ्यावी म्हणून उपाय योजना आखण्याचे निर्देश दिले. यावेळी नदी-नाल्यांच्या पात्रात तुटून पडलेली धोकादायक झाडे दूर करण्याच्या सूचना ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्या. गेले दोन-तीन दिवस पडलेल्या पावसामुळे माडखोल धरण ओसंडून वाहत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून ही पाहणी करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, प्रशांत चव्हाण, माजी सरपंच संजय लाड, बाळू शिरसाठ, दत्ताराम कोळकर आदी उपस्थित होते.