
सावंतवाडी : भारतीय किसान संघ महाराष्ट्रच्या ग्राम समिती, कोलगाव यांच्यावतीने ई - पीक पाहणी ॲपमधील विविध समस्यांबाबत सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन देण्यात आले.
भारतीय किसान संघ ग्राम समिती कोलगाव यांच्या वतीने तहसीलदार सावंतवाडी यांना निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे की, नव्याने अद्यावत झालेल्या ई - पीक पाहणी या ॲपमध्ये अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे सातबारामध्ये पिकांची नोंद करताना विविध अडचणी येत आहेत. यात प्रत्यक्ष जागी जाऊन मोबाईलद्वारे नोंदणी केली असता सदर पिकाचे लोकेशन अर्थात ठिकाण किंवा सर्व्हे नंबर योग्य जागी न दाखवता अन्य ठिकाणी अर्थातच काही वेळा अन्य सर्व्हे नंबरमध्ये ते दाखवते. तसेच या ॲपमध्ये काही ठिकाणी जुने सर्व्हे नंबर दाखवले जात आहेत.
तरी कृपया या त्रुटींची पूर्तता करून ई - पीक पाहणीची मुदत संपण्यापूर्वी दुरुस्ती करून मिळावी, अशी विनंती किसान संघाचे कोलगाव ग्राम संघ अध्यक्ष मुकेश मोहन ठाकूर यांनी केली आहे.
यावेळी भारतीय किसान संघाचे जिल्हा मंत्री अभय भिडे, जिल्हा सहमंत्री मनोहर ठिकार, ग्राम समिती अध्यक्ष कोलगाव मुकेश ठाकूर, सदस्य रुपेश परब, अभिजीत सावंत चंद्रकांत सावंत, विद्धेश धुरी, पुरुषोत्तम कासार, महेश टीळवे यांसह अन्य उपस्थित होते.
दरम्यान याबाबत सखोल माहिती घेऊन लवकरच यावर उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन तहसीलदार श्रीधर पाटील यांनी भारतीय किसान संघाच्या सदस्यांना दिले आहे.