
देवगड : देवगडचे तहसीलदार रमेश पवार यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त देवगड तहसील कार्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यात भावनिक वातावरण निर्माण झाले. आपल्या शासकीय सेवाप्रवासातील आठवणींना उजाळा देताना तहसीलदार रमेश पवार यांनी देवगडशी असलेले आपले जिव्हाळ्याचे नाते व्यक्त केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, "देवगड तालुक्यात तहसीलदार म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर या कार्यालयातील उपलब्ध सुविधा पाहिल्या. सर्वसामान्य नागरिकांना अधिकाधिक सोयी-सुविधा कशा उपलब्ध करून देता येतील, याकडे प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले. त्या सुविधा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. देवगडमध्ये माझा शासकीय सेवाप्रवास 1990 साली सुरू झाला. त्यावेळी नोकरीसाठी रुजू झाल्यानंतर येथील तहसीलदार निवासस्थान आणि अल्पबचत इमारतीमध्ये दहा दिवस वास्तव्यास होतो. त्याच देवगडमधून माझ्या शासकीय सेवेचा प्रवास सुरू झाला आणि आज मुंबईपर्यंत विविध ठिकाणी सेवा बजावल्यानंतर पुन्हा देवगडमध्येच सेवानिवृत्त होत असल्याचा विशेष आनंद वाटत आहे."
कार्यालयीन कामकाजाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, "ज्याप्रमाणे आपले घर असते, त्याचप्रमाणे कार्यालयही आपलेच असते. घराचे अंगण स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवले जाते, त्याच पद्धतीने कार्यालयाचा परिसरही स्वच्छ, सुबक आणि सकारात्मक वातावरणाचा असावा. त्यामुळे येथे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना नवी ऊर्जा मिळते. हे वातावरण निर्माण करण्याचा मी प्रामुख्याने प्रयत्न केला."
उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना त्यांनी जीवनातील यशाचा मंत्रही दिला. "जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कार्यालयात आलेल्या पक्षकार किंवा नागरिकांचे म्हणणे आधी शांतपणे ऐकून घ्या. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर ५० टक्के काम पूर्ण होते. उर्वरित ५० टक्के काम प्रामाणिकपणे आणि सकारात्मक दृष्टीकोनातून केले तर जीवनात नक्कीच यश मिळते," असा सल्ला त्यांनी दिला.
या सत्कार सोहळ्यात व्यासपीठावरील मान्यवरांनीही आपल्या मनोगतातून तहसीलदार रमेश पवार यांच्या कार्यपद्धतीचे, लोकाभिमुख दृष्टिकोनाचे आणि प्रशासकीय योगदानाचे कौतुक केले. त्यांच्या कार्यकाळात नागरिकाभिमुख प्रशासन, कार्यालयीन सुविधा, स्वच्छता आणि कर्मचारी समन्वय यांना विशेष प्राधान्य दिल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
यावेळी गणेश राणे, मिलिंद साटम, नंदकुमार घाटे, तहसीलदार रमेश पवार यांच्या मातोश्री, पत्नी, मुलगा, सून, नातवंडे, शाम जाधव, शाम कदम, नायब तहसीलदार संतोष खरात, छाया आखाडे, संग्राम गुट्टे, विविध गावांतील सामाजिक कार्यकर्ते, तलाठी, मंडळ अधिकारी तसेच तहसील कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










