कोल्हापूर - वैभववाडी रेल्वे मार्गातील तांत्रिक अडचणी दूर ?

Edited by: भरत केसरकर
Published on: July 05, 2023 20:59 PM
views 783  views

कुडाळ : कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी मधील साठीच्या सर्व तांत्रिक अडचणी दूर झाले असून लवकरच या प्रकल्पाच्या कामास सुरुवात होण्याचा विश्वास कोकण रेल्वेच्या आज संपन्न झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. या मार्गाच्या उभारणीची जबाबदारी मध्य रेल्वेवर सोपवण्यात आली असून या संदर्भात मध्ये रेल्वे कोकण रेल्वे यांची संयुक्त बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार असून यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी पुढाकार घेण्याचे आजच्या बैठकीत मान्य केले.

कोकण रेल्वेच्या मुख्य सल्लागार समितीच्या गोवा येथे पार पडलेल्या बैठकीत कोकण रेल्वेच्या 800 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावरील एकूण 72 स्टेशन्स व या संपूर्ण मार्गावरील सुविधांची सुधारणा प्रवाशासाठीच्या सुविधा नवीन मार्गावरील रेल्वे वाहतूक व मालवाहतुकीच्या सुविधा वाढवणे अशा विविध 41 विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. खासदार धनंजय महाडिक व महाराष्ट्र चेंबूर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गा संबंधी प्रश्न उपस्थित केले व या मार्गाचे काम लवकरात लवकर सुरू होण्यासाठीचा आग्रह धरला खासदार धनंजय महाडिक यांनी यासंदर्भात राज्य सरकारकडून द्यावयाच्या खर्चाचा वाटा लवकर उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. या  बैठकीत ललित गांधी यांनी कोकण विभागातून आंबा व अन्य फळांच्या वाहतुकीसाठी रो रो सेवा सुरू करण्याची मागणी केली ती मान्य करण्यात आली. व येत्या हंगामापासून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव स्टेशन वरून रो रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोकण रेल्वेचे अध्यक्ष संजय गुप्ता यांनी कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्ग हा प्रवासी व मालवाहतुकीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून या मार्गामुळे कोकण रेल्वेच्या उत्पन्नात भर पडणार असल्याचे सांगितले, तसेच या मार्गामुळे कोल्हापूर दक्षिण भारताशि थेट जोडले जाईल व त्याचा व्यापार उद्योग व पर्यटनाच्या विकासासाठी उपयोग होईल असेही सांगितले. खासदार धनंजय महाडिक यांनी रेल्वे सुधारणा संदर्भातल्या विविध सूचना दिल्या.


मुख्य सल्लागार समितीच्या बैठकीला उपस्थित खासदार फ्रान्सिस सारडीन्हा, खासदार धनंजय महाडिक, खासदार उमेश जाधव, खासदार इराप्पा काडादी, खासदार एन. के. प्रेमाचंद्रन, आमदार गणेश गावकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे ट्रस्टी आशिष पेडणेकर, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स चे संचालक चंद्रकांत गवस, प्रवासी संघटनेचे सचिन वाहाळकर यांनी चर्चेत सहभाग घेतला. या बैठकीला कोकण रेल्वेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.