नांदगाव येथे बॅनर फाडल्याने राडा

या विकृत मानसिकतेचा ग्रामस्थांनी केला निषेध
Edited by:
Published on: November 12, 2022 08:52 AM
views 403  views

कणकवली : नांदगाव तिठा येथे असलदे सरपंच गुरुप्रसाद गणपत वायंगणकर यांचा ग्रामस्थांनी लावलेला बॅनर काढल्याच्या रागातून गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास हायवे ब्रीजच्या बाजूला सर्व्हिस रोडवर हाणामारीची घटना घडली. याप्रकरणी असलदे सरपंच गुरुप्रसाद वायंगणकर(३९) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन कमलेश सुरेश मोरये(३८, रा. नांदगाव) याच्या विरुध्द तर कमलेश मोरये याने दिलेल्या तक्रारीवरुन गुरुप्रसाद वायंगणकरसह पाचजणांवर गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.

असलदे सरपंच गुरुप्रसाद वायंगणकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, नांदगाव तिठा येथे ग्रामस्थांनी त्यांच्या लावलेल्या बॅनरवर कमलेश मोरये याने लाथा मारुन त्यावर थुंकून आग लावत असताना गुरुप्रसाद यांनी अटकाव केला. त्या रागातून कमलेश मोरये याने त्यांना शिवीगाळ करुन लाकडी दांडयाने मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. त्यावेळी ग्रामस्थांनी पोलिसांना पाचरण करून मोरये यांच्या या गुन्हेगारी प्रवृत्तीचा निषेध करत मोरये पोलिसांच्या स्वाधीन केले.

तर कमलेश सुरेश मोरये याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, नांदगाव तिठा येथे गुरुप्रसाद वायंगणकर यांचा बॅनर काढला असता गुरुप्रसाद गणपत वायंगणकर, सुरेश गणपत वायंगणकर, रघूनाथ लोके, संतोष परब, प्रशांत परब (सर्व रा.असलदे) यांनी आपणास शिवीगाळ करुन जमाव करत हाताच्या थापटाने व लाथाबुक्याने मारहाण केली. याप्रकरणी या पाचजणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी तपास पोलिस उपनिरीक्षक विनायक चव्हाण करत आहेत.