
सिंधुदुर्गनगरी : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची थकीत वेतन देयके, मेडिकल बिले यासह विविध कामे मागील २ वर्षापासून प्रलंबित आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारती संघटनेच्या वतीने आज जिल्हा परिषदेसमोर साखळी धरणे आंदोलन करण्यात आले.
शिक्षक भारती या संघटनेकडून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित कामाबाबत वारंवार लक्ष वेधूनही मागील दोन वर्ष काळातील प्रलंबित कामे माध्यमिक शिक्षण विभागाकडे प्रलंबित असून अद्याप पर्यंत पूर्तता झालेली नाही. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची थकीत वेतन देयके, मेडिकल बिले तसेच मेडिकल बिलांसाठी रेशन कार्ड ची रद्द करणे, रजा कालावधीतील प्रस्ताव, नागरिकांची सनद कार्यालयाबाहेर लावणे, थकीत बिलांची पूर्तता करणे , शाळाबाह्य कामे कमी करा. सहविचार सभा लावणे, सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित पेन्शन प्रस्ताव पाठवणे, ही कामे करण्याची आश्वासने प्रशासनाकडून देउनही ही कामे अद्याप पर्यंत प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. ती तात्काळ मार्गी लावावित . याकडे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारती संघटनेच्या वतीने आज जिल्हा परिषदेसमोर साखळी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिक्षक भारती संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रशांत आडेलकर, संजय वेतोरेकर ,दीपक तारी , विद्यानंद पिळणकर यांच्यासह शिक्षक भारती संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत . यावेळी दिलेल्या निवेदनातुन ३५ शिक्षकांची प्रलंबित रहिलेल्या कामांची यादी माध्यमिक शिक्षणाधिकारी याना सादर करून त्यांचे लक्ष वेधले .तर या व्यतिरिक्त अनेक कामे प्रलंबित असल्याचे म्हटले आहे .