
चिपळूण : हुतात्मा अपंग बहुउद्देशिय विकास कल्याणकारी संस्था कराड यांच्या वतीने '११ वा राज्यस्तरीय कोकण गौरव पुरस्कार २०२५' हा सोहळा नुकताच पार पडला. हा सोहळा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये कुलगुरू डॉ. संजयजी भावे यांच्या हस्ते शिक्षक अनंत शिवराम शिगवण यांना सामाजिक क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनिय कामगिरीमुळे समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
अनंत शिगवण शिक्षक असून सध्या जिल्हा पूर्ण प्राथमिक शाळा मुर्तवडे कातळवाडी नं. २ येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. शिक्षकीपेशात असूनही सामाजिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनिय कामगिरी केली आहे. फुरूस पंचक्रोशी कुणबी या संघटनेमध्ये गेली २५ वर्षे कार्यरत आहेत. या संघटनेचे सचिव पदही भूषविले आहे. आता सल्लागार या पदावर कार्यरत आहेत. या संघटनेच्या माध्यमातून शेतकरी मेळावे, विद्यार्थी गुणगौरव, झाडांचे वाटप, समाजातील रूढी-परंपरेतील बद्दल इत्यादी कृतीशिल उपक्रम राबविले. ते कुणबी शिक्षण संस्था, चिपळूण संघटनेच्या संचालक पदावर कार्यरत आहे. या संघटनेच्या माध्यमातून गरिब विद्यार्थ्यांना वसतीगृहात राहण्याची मोफत सोय, विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम, करिअर मार्गदर्शन इत्यादी उपक्रम राबविले.
कुणबी वधुवर सुचक या संस्थेमध्ये सदस्य या पदावर कार्यरत आहेत. तसेच ते कुणबी शिक्षक विचारमंच सावर्डे या संघटनेच्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. या संघटनेच्या वतीने विद्यार्थी उपयोगी कार्यक्रम राबवित असतात. तसेच समाजातील वादविवाद आपल्या शांत संयमी शैलीतून मिठवितात. अशा या शिक्षकीपेशात असूनही सामाजिक भान जपणाऱ्या गुरुजीना संस्थेचे संस्थापक डॉ. सुनिल फडतरे यांनी 'समाजरत्न पुरस्कारासाठी निवड करून पुरस्काराने सन्मानित केले. त्यांना समाजरत्न पुरस्कार मिळताच जिल्ह्यातून अनेक सामाजिक संघटनांच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.