तळवडे ग्रामपंचायत अपहार प्रकरण

सरपंच, ग्रामसेवक आणि तीन ठेकेदारांवर गुन्हा दाखल
Edited by: विनायक गांवस
Published on: August 16, 2024 13:51 PM
views 242  views

सावंतवाडी : तळवडे येथील ग्रामपंचायत मध्ये ७२ लाखांचा अपहार झाला आहे. या पार्श्वभूमीवर सरपंच, ग्रामसेवक आणि तीन ठेकेदार मिळून पाच जणांच्या विरोधामध्ये सावंतवाडी पोलीस ठाण्यामध्ये अपहाराचा गुन्हा दाखल झाला असून त्याची चौकशी सुरू केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली. तळवडे ग्रामपंचायत मध्ये जाऊन काही कागदपत्रे जप्त केली आहेत असे त्यांनी सांगितले.

याबाबत विस्तार अधिकारी गजानन धर्णे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या पार्श्वभूमीवर तळवडे सरपंच, ग्रामसेवक, तीन ठेकेदार अशा पाच जणांच्या विरुद्ध आर्थिक अपहार केला म्हणून दाखल करण्यात आला आहे. तळवडे येथील विविध विकास कामे झाल्याचे दाखवले. मात्र, कामे न करता पैसे हडप केल्याच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कंपाउंड वॉल, साहित्य खरेदी , संगणक खरेदी झाल्याचे दाखवले. मात्र काम न करतात पैसे लाटल्याची तक्रार करण्यात आली होती.

नोव्हेंबर २०२१ ते नोव्हेंबर २०२३ या आर्थिक वर्षांमध्ये हा अपहार झाला आहे .याप्रकरणी जिल्हा परिषद ने चौकशी अधिकारी नेमून चौकशी केली. गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी चौकशी करून अहवाल सादर केला होता. मात्र ऑडिट झाले नसल्याने याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. आता गुन्हा दाखल करून पोलीस ऑडिट करून घेणार असल्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी म्हटले आहे.

दरम्यान, याबाबत सामाजिक कार्यकर्ते नारायण उर्फ बाळा जाधव म्हणाले , जनता दरबार मध्ये पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले होते. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कणखर भूमिका घेतली त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय पाठबळ मिळाले होते त्यामुळे पोलिस व जिल्हा परिषद गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत होते. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दमदार भूमिका घेतली त्यामुळे अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.