
सावंतवाडी : खरीप हंगामातील पिकांची लागवड आणि व्यवस्थापन यासाठी आवश्यक असलेली माहिती आणि मार्गदर्शनासाठी खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळा तसेच आत्मा अंतर्गत किसान गोष्टी कार्यक्रम पार पडला. याचे उद्घाटन बांदा सरपंच प्रियांका नाईक, विलवडे सरपंच प्रकाश दळवी, तांबोळी सरपंच वेदिका नाईक, माजी उपसरपंच तथा बांदा सोसायटीचे चेअरमन राजाराम उर्फ बाळू सावंत, तालुका कृषी अधिकारी जी.एस. गोरे, सिंधुदुर्ग बागायतदार फार्मर प्रोड्युसरचे चेअरमन विलास सावंत आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विद्यापीठातून विकसित झालेले नवीन तंत्रज्ञान आणि पद्धती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे यातून बियाणे प्रक्रिया, माती परीक्षण, पाणी व्यवस्थापन, कीड आणि रोग नियंत्रण इत्यादी विषयी आवश्यक माहिती अशा कार्यशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपयुक्त ठरते.कृषी विभागाच्या माध्यमातून अशा कार्यशाळेतून नवीन तंत्रज्ञान आणि पद्धती शिकून शेतकरी आपली शेती अधिक सक्षमपणे करू शकतात.योग्य नियोजन आणि व्यवस्थापनामुळे पिकांचे उत्पादन वाढते यातून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ही सुधारते तसेच उत्पादन खर्च कमी होऊन नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर आणि व्यवस्थापनामुळे शेती अधिक शाश्वत होते. खरीप हंगामासाठी पूर्वनियोजन महत्त्वाचे असून शेतकऱ्यांनी मग्रारोहयो फळबाग लागवड या योजनेचा लाभ घेण्याविषयी तालुका कृषी अधिकारी जी.एस.गोरे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले. यावेळी शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करून मार्गदर्शन करण्यात आले तसेच कृषि विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहू असे मतही त्यानी व्यक्त केले. तसेच सन २०२४-२५ मधील राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली .शेतकऱ्यांना कार्यशाळेच्या माध्यमातून ॲग्रीस्टॅक आणि पी एम किसान कॅम्प या माध्यमातून शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून कृषी विभागाचे कौतुक बांदा सरपंच प्रियांका नाईक यांनी केले.शेतकऱ्यांच्या हितासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करून अशा कार्यशाळेतून शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडून अशा कार्यशाळेचा उपयोग शेतकऱ्यांना नक्कीच फायदेशीर होणार याबाबत कृषी विभागाचे अभिनंदन बांदा माजी उपसरपंच राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी केले.
नैसर्गिकरित्या उत्पादित खते आणि कीटकनाशके वापरून शेती करणे आणि रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरू नयेत याविषयी सखोल मार्गदर्शन कृषि सहाय्यक मिलिंद निकम यांनी केले. तर पेरणीपूर्वी बियाणावर योग्य प्रक्रिया करणे ज्यामुळे त्यांची उगवणक्षमता वाढते आणि रोपांची वाढ चांगली होते. याविषयी मार्गदर्शन कृषी पर्यवेक्षक एस. ए. सदगुरु यांनी केले. यावेळी भात बियाणांची बीजप्रक्रिया व उगवण क्षमता चाचणी यांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले . सदर कार्यशाळेमध्ये पाणी फाउंडेशन मार्फत डॉ. अविनाश पोळ यानी डिजिटल शेतीशाळा या विषयावर झूमद्वारे मार्गदर्शन केले तसेच पाणी फाउंडेशनची क्लिप शेतकऱ्यांना दाखवण्यात आली.
कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण कृषी पर्यटक उभारणी यासारख्या विविध पद्धतीचा अवलंब करून उत्पादनात वाढ करता येते. असे सिंधुदुर्ग बागायतदार फार्मर प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन विलास सावंत यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
जल व्यवस्थापनातील सीआरए तंत्रज्ञान, जलतारा, जलकुंड इत्यादी योजनांची माहिती मंडळ कृषी अधिकारी बांदा युवराज भुईंबर यानी दिली.
कृषी विभागाच्या विविध कल्याणकारी योजना महाडीबीटी प्रणाली,एमआरजीएस व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड,पिकविमा, पीक स्पर्धा,कृषी पुरस्कार इत्यादी विविध योजनांची सविस्तर माहिती कृषी पर्यवेक्षक वि. के. पाटील यांनी दिली.
स्थानिक भात बियाणे अनेक प्रकारचे उपलब्ध असून यावेळी खारामुनगा,बेळा,वालय,सोरटी, अडीचक्या,काळाभात यासारखी दुर्मिळ होत असलेल्या स्थानिक जातीचे संवर्धन करणे गरजेचे असून शेतकऱ्यांना या भात बियाण्याचे फायदे समजण्यासाठी स्थानिक भात बियाणे तसेच विशेष फळ पिकांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.अनेक शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. यावेळी ॲग्रीस्टॅक आणि पी एम किसान कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कोकण सेंद्रिय कंपनीचे चेअरमन आनंद गावडे माजी सरपंच तांबोळी अभिलाष देसाई, प्रगतशील शेतकरी सिताराम देसाई सिंधुदुर्ग बागायतदार फार्मर प्रोड्युसर संचालक करमळकर, सुरेश गावडे तसेच तालुका कृषी विभागातील मंडळ कृषी अधिकारी, कृषीपर्यवेक्षक कृषीसहाय्यक तसेच शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालुका कृषी अधिकारी जी.एस. गोरे यांनी केले तर सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक एस. ए. सदगुरु तर आभार मंडळ कृषी अधिकारी बांदा युवराज भुईंबर यांनी मानले.