तळवणे डाकघर शाखा अपहार प्रकरण

अटी - शर्तींवर सुटका
Edited by: विनायक गांवस
Published on: May 15, 2025 11:31 AM
views 21  views

सावंतवाडी : तळवणे शाखा डाकघर येथे अपहार केल्याचा आरोप असलेल्या संशयीतास आज अटक करून सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर संशयिताची  ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तसेच काही अटी व शर्तींवर सुटका करण्यात आली.

फिर्यादी विनायक नारायण कुलकर्णी (सहाय्यक डाक अधीक्षक सिंधुदुर्ग विभाग) (वय ५२)  यांनी दि. २५ जुलै २०२४  रोजी तळवणे शाखा डाकघर, येथे दि.२८ ऑगस्ट २०१३ ते १० ऑक्टोबर २०२०  पर्यंत तळवणे शाखा डाकघर, येथे डाकपाल म्हणून कार्यरत असलेले, व सध्या परेल मुख्य डाकघर मुंबई पूर्व विभाग येथे पोस्टमन पदी कार्यरत असलेले सतीश संजय पवार (वय ३१) यांच्याविरुद्ध  ते तळवणे शाखा डाकघर येथे डाकपाल म्हणून काम करीत असताना तळवणे शाखा डाकघरातील खातेदारांच्या बचत खाते, सुकन्या समृद्धी खाते, आवर्ती ठेव खाते व मुदत ठेव खाते अशा एकूण ११  खात्यांमध्ये अपहार करून खातेदारांचे पैसे त्यांच्या खात्यात व सरकारी हिशोबात जमा न करता आपल्या फायद्या  करता वापरून एकूण रक्कम रुपये २०६६०० /-(अक्षरी रुपये दोन लाख सहा हजार सहाशे मात्र) चा आर्थिक अपहार करून खातेदारांची व डाक विभागाची फसवणूक केल्याची तक्रार सावंतवाडी पोलिस ठाण्यात दिलेली होती.

त्यामुळे आज आरोपी यांना सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात आलेले होते. यावेळी संशयिताच्या वतीने ॲड. राहुल मडगांवकर यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने संशयितास ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तसेच काही  अटी व शर्तींवर मुक्त करण्याचे आदेश दिले.