तळवडे घोटाळ्यात तुमच्या नेत्यांची अदृश्य शक्ती !

भाजपचा पुन्हा हल्लाबोल
Edited by: विनायक गांवस
Published on: August 21, 2024 10:02 AM
views 688  views

सावंतवाडी : भ्रष्टाचारा संबंधित दोषींवर कारवाईबाबत तक्रार केली तेव्हा तुम्ही मुग गिळून गप्प का होता ? याचाच अर्थ या प्रकरणामागे तुमच्या नेत्यांची अदृश्य शक्ती होती असा पुनरुच्चार भाजपाचे माजी सभापती पंकज पेडणेकर व ग्रामपंचायत सदस्य दादा परब यांनी केला. तळवडे गावच्या विषयात भावनिक प्रयत्न करण्याचा तुमचा हेतू गावातील जनता म्हणून पाडेल असा टोलाही त्यांनी लगावला.  


पंकज पेडणेकर म्हणाले, तळवडे गावाने मला सरपंच व पंचायत समिती सभापती पदापर्यंत नेऊन ठेवले. गावाने मला वेळोवेळी सन्मान दिला. त्यामुळे जालिंदर परब यांची माझ्यावर बोलण्याआधी आपली राजकीय उंची तपासावी. आम्ही भ्रष्टाचार उघड होण्यासाठी आवश्यक तो  पाठपुरावा केला. तालुका स्तरापासून जिल्हास्तरापर्यंत सर्व गोष्टी केल्या. परंतु या ग्रामपंचायत बाबत जर तुम्हाला आस्था होती तर तुम्ही या प्रश्नाबाबत आजपर्यंत गप्प का राहिलात ? भारतीय जनता पार्टी ही नेहमी गावाच्या हितासाठी गावाच्या सोबत राहिली आहे. ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचारा मध्ये गावाला न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी सक्षम आहे. त्यामुळे ग्रामपंचायत बॉडी बरखास्त करा असे म्हणणारे तुम्ही इतके दिवस मुग घेऊन गप्प का होतात ? त्यामुळे या सर्व प्रकरणामागे तुमच्या नेत्याचीच अदृश्य शक्ती कार्यरत होती आणि आहे असं ते म्हणाले. 

            

दादा परब म्हणाले, तळवडे ग्रामपंचायत सत्ता बसवताना जालिंदर परबासह यांच्यासह शिंदे गटांच्या लोकांचा हात होता. त्यामुळे ग्रामपंचायतीशी आमचा काही संबंध नाही असे सुरज परब आणि जालिंदर परब म्हणत असतील तर ते धादांत कोठे आहे. आज शिवसेनेत दोन गट पडल्याने हे वेगवेगळे आहोत असे दाखवून देत आहेत. परंतु सत्ता जर तुम्ही बसवली तर तुमच्या सरपंचांना ग्रामपंचायत कारभाराबाबत तुम्ही मार्गदर्शन का केली नाही ? मुळात आम्ही कारवाईची मागणी केल्यानंतर तसेच संबंधितावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तुम्ही कारवाई व्हावी अशी भूमिका घेतात. मात्र, या आदी केलेल्या तक्रारीबाबत एक तरी पुरावा तुम्ही दाखवा. या प्रकरणांमध्ये पोट ठेकेदारी मध्ये आमचा हात असल्याचाही आरोप सुरज परब यांनी केला. मात्र उगाचच बिनबुडाचे आरोप त्यांनी करुन पोट ठेकेदारीशी आमचा संबध जोडू नये असं मत व्यक्त केले. यावेळी  ग्रामपंचायत सदस्य, मंगलदास  पेडणेकर, सुरेश मांजरेकर,रामचंद्र गावडे, श्यामसुंदर कुमार, श्याम शेटकर, उदय शिरोडकर, विनोद गावडे, वासुदेव जाधव, नीलकंठ नागडे, आदी उपस्थित होते.