गणेश चतुर्थीमध्ये सिंधुदुर्गात भेसळ युक्त दुग्धजन्य पदार्थांवर कारवाई करा

सरचिटणीस परशुराम उपरकर यांची मागणी
Edited by: उमेश बुचडे
Published on: September 11, 2023 20:29 PM
views 107  views

कणकवली : गणेश चतुर्थीच्या सणासाठी सुमारे १५ दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठया प्रमाणावर विविध कंपन्यांचे आणि सहकारी संस्थांचे दूध परजिल्ह्यातून व परराज्यातून विक्रिसाठी येत असते. परंतू या जिल्ह्यामध्ये दुध व दुग्धजन्य पदार्थासाठी भेसळ तपासणी सक्षम यंत्रणा सध्या अस्तित्वात असल्याचे दिसून येत नाही. त्यासाठी जिल्ह्यात येणारे सर्व प्रकारचे दूध, तूप, पनीर, बर्फी आणि दुधापासून बनविण्यात येणाऱ्या दुग्धजन्य पदार्थाची कडक तपासणी येत्या १५ सप्टेंबर २०२३ पासून दररोज सुरू करण्यात यावी अशी मागणी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे  मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडेकेली आहे.


शासकीय दूध योजना बंद झाल्यापासून गेली ४ वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जनतेला विक्रि होणारे दूध व तूप, श्रीखंड, पनीर, बर्फी, मिठाई, लस्सी इत्यादी दुग्धजन्य पदार्थ तपासणी सक्षम यंत्रणा कार्यरत नाही. त्यामुळे किमान सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चतुर्थीच्या सणात बंद पिशव्यातून येणारे विविध कंपन्यांचे आणि सहकारी संस्थांचे लाखो लिटर दूध तपासले जाणे जनतेच्या आरोग्याच्यादृष्टीने आवश्यक आहे. पॅक बंद येणारे "पाश्चराईज्ड टोण्ड दूध" किमान मान्यतेच्या फॅट / एसएनएफ नुसार आहे काय ? त्यामध्ये दूध पावडरचे / टेबलबटरचे प्रमाण किती आहे? साखरेचे प्रमाण किती दिसून येते यांची लॅबोरेटरीमध्ये तपासणी होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच “गाईचे दूध " किमान ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ् आणि म्हैस दूध फॅट एसएनएफ् दर्जाचे असणे आवश्यक आहे.

 दुध उत्पादनाच्या ६० टक्के दूध भेसळयुक्त पुरवाले जाते. त्यामुळे सदर भेसळयुक्त दुध जनतेला हानिकारक आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होणाऱ्या दुधाची कडक तपासणी करणे गरजेचे आहे. कारण नागरीक व लहान मुलांच्या आरोग्याच्या काळजीसाठी दुध तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे.


जिल्ह्यात येणाऱ्या कंपन्यांच्या दुधाचे ५०० मिली प्रमाण वजन काटयानुसार व लिटरच्या प्रमाणानुसार भरते किंवा कसे याची ही मोजमाप वजनमापे निरिक्षकांकडून होणें आवश्यक आहे. पिशवीवरील मारलेला दिनांकाचा स्टॅम्प हा त्याच दिवसाचा आहे काय? हे ही तपासण्याची गरज आहे. चतुर्थीमध्ये सर्रास वापरण्यात येणारे पॅकबंद तूप किती दिवसांचे आहे. त्याचा दर्जा तपासला पाहीजे. केवळ पॅकींग केले आहे म्हणून गुणवत्ता सिद्ध होत नाही.


सिंधुदुर्गातील जनतेला किमान चतुर्थीच्या सणात चांगल्या दर्जाचे व प्रतीचे दूध व दूग्धजन्य पदार्थ मिळाले पाहिजे अशी मनसेची मागणी करत आहे.त्याचप्रमाणे ऐन सणाचा लाभ उठविण्यासाठी काही दूध विक्रकते चतुर्थीमध्ये दूध पिशवी जास्त वाढीव दराने विक्रि करतात. त्यांचेवर विक्रि दराचा बोर्ड ग्राहकांना दिसेल असा लावण्याबाबत कडक अंमलबजावणी करावी.


मुंबई / पुणे वैगरे भागांतून दरवर्षी लाखो गणेश भाविक चतुर्थीच्या सणांत सिंधुदुर्गातील गावांगावांतून दाखल होणार आहेत. त्यांना  दूध व इतर अत्यावश्यक पदार्थांचे दर वाढवून सांगितले जातात. याकडे जिल्हा प्रशासन, दुग्धव्यसाय विकास खाते, आर. टी. ओ., वजनमापे खाते आणि पोलिस प्रशासन यांनी सयुक्तपणें दर नियंत्रणासाठी आणि ग्राहकांना दर्जेदार दुधाचा पुरवठा होण्यासाठी सक्षम अशी यंत्रणा राबवावी आणि जनतेला चांगली सेवा द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही करीत आहोत. त्याची योग्य ती दखल घेण्यात यावी. अशी मागणी मनसे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.