'ताज'मुळे शिरोडा आंतरराष्ट्रीय नकाशावर झळकेल : दीपक केसरकर

Edited by: दिपेश परब
Published on: December 23, 2023 19:26 PM
views 584  views

वेंगुर्ला : ताज प्रकल्प सुरू होण्याच्या सर्व अडचणी दूर झाल्या आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी पुढाकार घेऊन सर्व नियोजन झालं आहे. मोजणी करणे हा शासनाचा भाग आहे. काही किरकोळ मोजणी शिल्लक आहे ती झाल्याशिवाय मुख्य समस्या लक्षात येणार नाही. काही लोकांच्या घराचे कोपरे, देवस्थान हे संपादित जागेत गेलेले आहेत. ते सर्व प्रश्न सोडवण्यात येतील. यामुळे कोणीही मनामध्ये शंका बाळगण्याचे कारण नाही. काही लोक याला दिरंगाई करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रकल्प झाल्यानंतर शिरोडा हे आंतरराष्ट्रीय नकाशावर येईल अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिरोडा येथे दिली.

ताज प्रकल्पासंदर्भात जमीन मोजणी प्रश्नी आज शनिवारी २३ डिसेंबर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्थानिक ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी  जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल,  प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी, माजी आमदार शंकर कांबळी, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव, हॉटेल व्यावसायिक जगन्नाथ डोंगरे यांच्यासाहित ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी दीपक केसरकर पुढे बोलताना म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात ही एकमेव घटना आहे की भु-संपादन झालेलं असताना त्या कंपनीने पुन्हा पैसे देण्याचे मान्य केलं आहे. मोजणी न झाल्याने ते पैसे जमीनदारांच्या खात्यात यायला उशीर होत आहे. नागरिकांच्या म्हणण्या प्रमाणे गणपती गेला, दिवाळी गेली जमीन मोजणी पुढे गेली मात्र खूप उशिरापर्यंत ही मोजणी ठेवता येणार नाही असेही ते म्हणाले.