'ताज' फाईव्ह स्टार हॉटेल - पाणबुडीमुळे रोजगाराच्या नव्या संधी

चांगल्या प्रकल्पांना विरोध करण्याची चूक नको : दीपक केसरकर
Edited by: दिपेश परब
Published on: January 18, 2025 18:56 PM
views 386  views

वेंगुर्ल्यातील रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन  

वेंगुर्ले : ज्या गावातील रस्ता समृद्ध त्या गावाचा विकास झपाट्याने होतो. वजराट गावात तीन मोठी कामे मंजूर झाली असून काही दिवसातच ती पूर्णत्वाला येणार आहेत. मंत्रिपदाची जबाबदारी नसल्याने आता पूर्णवळ मतदारसंघातील कामांवर आपला लक्ष असणार आहे. पण एकटा माणूस सगळीकडे पोहोचू शकणार नाही त्यामुळे तुम्हा सर्वांचा सक्षम पाठिंबा हवा आहे. वेंगुर्ले तालुका येत्या पाच वर्षात आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकणारच याची खात्री बाळगा. ताज ग्रुपचा पंचतारांकित हॉटेल प्रकल्प व वेंगुर्ल्यातील पाणबुडी प्रकल्प रोजगाराच्या नव्या संध्या उपलब्ध करणारा आहे. नवीन बदल स्वीकारण्यासाठी तयार व्हा. चांगल्या प्रकल्पांना विरोध करण्याची चूक करू नका, कारण संधी पुन्हा पुन्हा दार ठोठावत नाही. असे प्रतिपादन आमदार दीपक केसरकर यांनी वजराट येथे केले.

     वजराट देऊळवाड़ी येथे आडेलीपासून वजराट, होडावडा, मातोंडमार्गे आजगावपर्यंत जाण्याऱ्या रस्त्याची सुधारणा व डांबरीकर, याच मार्गावरील वजराद देऊळवाडी येथे पूलाचे बांधकाम व मुख्यमंत्री सडक योजनेतून वजराट, देवसू कामळेवीर रस्ता सुधारणा व डांबरीकरण या कामांचे भूमिपूजन आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

     यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा समन्वयक सचिन वालवलकर, वजराट गावच्या सरपंच अनन्या पुराणिक, होडावडे गावच्या सरपंच रसिका केळुसकर, भाजपचे तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, भाजपचे तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, सुहास कोळसुलकर, शिवसेनेच्या महिला तालुका संघटक दीशा शेटकर, तालुका संघटक बाळा दळवी, परबवाडा सरपंच पपू परब, वजराटचे शाखा प्रमुख अण्णा वजराटकर, गावप्रमुख वसंत परब, नितीन परब, संजय परब, रसिका मेस्त्री, नामदेव कांदे, नितीन चव्हाण, संजय गावडे, रमेश राणे आदींसह शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, वजराट गावातील ग्रामस्थ व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

     पुरोहितांकरवी आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी व सरपंच अनन्या पुराणिक यांच्या हस्ते धार्मिक विधी करून या कामांची भूमीपूजन करण्यात आली. यावेळी मनिष दळवी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत विरोधकांचे आवाज पूर्णतः बंद झाले आहेत. चांगल्या कामांनाही विरोध करण्याचे विरोधकांचे षडयंत्र आता मोडीत निघाले आहे. विकासाची गंगा आता खऱ्या अर्थाने अधिक सक्रीयपणे वाहू लागेल. गेल्या अनेक वर्षापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेला रस्ता आता अध्ययावत होणार आहे. वजराट गावातील पुलाचे कामही काही दिवसात पूर्णत्वास येणार आहे. आमदार दीपक केसरकर व राणे कुटुंबियांच्या सहकार्याने या जिल्हयाचा विकास आता झपाट्याने होणार आहे, असे ते म्हणाले.

सूत्रसंचालन शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी केले, तर आभार शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी मानले.