
पणजी : कुडोपी येथील कातळशिल्पांमधील सांकेतिकता, चिन्हमयता (सिंम्बॉलिझम), लयबद्धता, वैविध्य आणि कलात्मक दृष्टी फारच क्वचित आढळणारी अपवादात्मक आणि अद्भूत आहे, असे प्रतिपादन पणजी येथील सुनापरान्त गोवा सेंटर फॉर द आर्टसच्या क्युरेटर आणि आर्ट हिस्टोरियन लिना विन्सेंट यांनी केले.
पणजी येथील सुनापरान्त गोवा सेंटर फॉर द आर्टसमधील कलाकार, चित्रकार, विद्यार्थी यांनी नुकतीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडोपी येथील प्रागैतिहासिक कातळशिल्प ठिकाणाला भेट देऊन या कातळशिल्पांची सखोल पाहणी केली. कातळशिल्प संशोधक आणि 'घुंगुरकाठी'चे अध्यक्ष सतीश लळीत यांच्या सहकार्याने या क्षेत्रीय भेटीचे आयोजन करण्यात आले होते. मूळचे मुंबई येथील व आता गोव्यात स्थायिक झालेले चित्रकार ओंकार क्षीरसागर यांच्या पुढाकाराने हा दौरा झाला.
कलाकार व चित्रकारांच्या या पथकाने सिंधुदुर्गातील कातळशिल्पांना प्रथमच भेट दिली. कुडोपी सड्यावर पोचल्यांनतर सतीश लळीत यांनी त्यांना सर्वप्रथम कातळशिल्पांबाबत माहिती दिली. साधारणपणे मध्याश्मयुग ते नवाश्मयुग या काळातील या परिसरात राहणाऱ्या मानवसमुहांनी मागे सोडलेल्या आपल्या पाऊलखुणांबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. यानंतर या पथकाने सुमारे चार तास या कातळशिल्पांची पाहणी करुन त्याची काही आरेखनेही केली.
यानंतर अत्यंत प्रभवित झालेल्या श्रीमती लिना विन्सेंट म्हणाल्या की, ही कातळशिल्पे महत्वाचा मानवी वारसा आहेत. त्या काळात या परिसरात व पश्चिम किनारपट्टीवर राहणाऱ्या मानवी समाजाची कलात्मक दृष्टी किती प्रगल्भ होती, याचे दर्शन त्यातून घडते. हा मानवी वारसा जपला गेला पाहिजे व त्याचा पुरातत्वीय अभ्यासाबरोबरच कला या अंगानेही अभ्यास झाला पाहिजे.
कोकणातील कातळशिल्पांवर कला या अंगाने काम करणारे चित्रकार ओंकार क्षीरसागर म्हणाले की, कुडोपी येथील कातळशिल्पे पाहिल्यावर असे लक्षात येते की, ती खोदणाऱ्यांना भुमिती, मिती, रेषा, चिन्हमयता यांचे ज्ञान होते. याचाच अर्थ त्या काळातील या भागातील मानवी समाज व त्यांची संस्कृती अतिशय प्रगल्भ होती. या ठिकाणाच्या आसपास मोठ्या प्रमाणात चिरेखाणी दिसतात. ही बाब लक्षात घेता त्यांचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.
गोव्यातून आलेल्या या पथकात खुशबु बिस्वाल, नोएला फर्नांडिस, विश्वजित नाईक देसाई, अशिता मातोंडकर, रुथ बियाट्रिझ कॉस्टा, तमन्ना अरोरा, ग्रेगन रिकार्डो डायस, रोहित भोसले, सोनिया रॉड्रिग्ज सभरवाल यांचा समावेश होता. या पथकाने नंतर जामडुल, आचरा येथील कांदळवन सफारीचाही आनंद लुटला आणि सिंधुदुर्गच्या नैसर्गिक सौंदर्याचे दिलखुलास कौतुक केले.










