
जिल्हाध्यक्ष प्रविण गवस यांसह स्वराज्य सरपंच सेवा संघ तहसीलदारमध्ये आंदोलन
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील सर्वसामान्य लाभार्थ्यांना अद्याप वाळू उपलब्ध करून देण्यात न आल्याने अखेर स्वराज्य सरपंच सेवा संघ आक्रमक झाला आहे. संघाचे जिल्हाध्यक्ष प्रविण गवस यांच्या नेतृत्वाखाली कळणे सरपंच अजित देसाई, तळकट सरपंच सुरेंद्र सावंत आदींनी तहसील कार्यालय, दोडामार्ग येथे ठिय्या आंदोलन छेडलं आहे.
प्रविण गवस यांच्यासह सरपंच अजित देसाई, सरपंच सुरेंद्र सावंत-भोसले यांच्या आंदोलनाला तालुक्यातील अनेक सरपंच व पदाधिकारी यांनीही पाठिंबा दिला आहे. तत्पूर्वी २४ नोव्हेंबरला तहसीलदारांना निवेदन देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. तसेच १६ डिसेंबर २०२५ पर्यंत लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे प्रविण गवस यांनी स्पष्ट केले.
ठिय्या आंदोलनादरम्यान प्रशासनाने तात्काळ निर्णय घेऊन घरकुल व इतर बांधकामांसाठी लागणारी वाळू त्वरित उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
तालुक्यातील नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित असलेला वाळूचा प्रश्न गंभीर बनला असून, प्रशासन या आंदोलनाची दखल घेते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शेकडोंच्या सख्येनं मंजूर घरकुल बांधायची कशी ?
शासनाने आवास योजनेअंतर्गत दोडामार्ग तालुक्यातील शेकडो लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजुरी दिली आहे. ही घरकुले वेळेत बांधणी करून पूर्ण करावी असा तगादा लाभार्थ्यांच्या मागे लावला आहे. मात्र असलेली वाळूच उपलब्ध होत नसल्याने हे घर लाभार्थ्यांनी बांधायची कशी? असा सवाल सरपंच सुरेंद्र सावंत भोसले यांनी उपस्थित केला आहे.











