स्वयंभू गणेश रेडीचा...कलशारोहण सोहळा भक्तीचा !

आरतीचा भक्तीनाद घुमला | रेडीचा कण अन् कण पावन झाला !
Edited by: दिपेश परब
Published on: March 28, 2023 19:32 PM
views 557  views

वेंगुर्ले : दक्षिण कोकणातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला रेडी येथील द्विभुज गणपती मंदिर चा संप्रोक्षण कलशारोहण सोहळा थाटात संपन्न झाला. रविवार २६ मार्चपासून सुरुवात झालेल्या या सोहळ्याला देशभरातील भाविकांचा जनसागर लोटला. 



रेडी गणपती कलशारोहण सोहळ्यानिमित्त २६ ते २८ मार्चपर्यंत भरगच्च धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी २४ मार्च रोजी सकाळी रेडी श्री गणपती मंदिर कलश कोल्हापूर येथून वाजत गाजत आणण्यात आला. २६ मार्चपासून चाललेल्या या कलशारोहण सोहळ्याची सांगता आज करण्यात आली. सकाळी रेडी श्री गजाननाचे कोल्हापूर येथील भक्त अजयसिंह विठ्ठलराव देसाई व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते कलशाची विधिवत पूजा करण्यात आली. यानंतर सवाद्य मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून रेडी गजानन देवस्थानचे मानकरी यांच्या हस्ते हे कलशारोहण करण्यात आले. 




यानंतर श्री गजाननाला नैवेद्य दाखवून मंदिरात महाआरती संपन्न झाली. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या सोहळ्यानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह, कोल्हापूर, बेळगाव, गोवा, मुंबई, पुणे व राज्यभरातील हजारो भक्तांनी या सोहळ्याला उपस्थित राहत श्री गजाननाचे दर्शन घेतले. 



रेडी येथील श्री गणपती मंदिर कलशारोहण निमित्त कोकणसादच्या विशेष पुरवणीचे प्रकाशन रेडी सरपंच रामसिंग राणे, रेडी गजानन देवस्थानचे विनायक कांबळी, फोमेंतो मीडियाचे संचालक ज्यो लुईस, गोगटे मिनरल्सचे व्ही नारायणप्रसाद, कोकणसादचे मुख्य संपादक सागर चव्हाण, अभिषेक चमणकर, रेडी देवस्थानचे सचिन कांबळी यांच्या हस्ते व अनेक भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आले.