
सावंतवाडी : रासायनिक खतांच्या विक्रीची जास्त दराने होत असलेल्या विक्रीबाबत इन्सुली ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर यांनी तालुका कृषी अधिकारी यांचे लक्ष वेधले आहे.
सावंतवाडी तालुक्यातील खत विक्रेता दुकानदार यांच्याकडून खताच्या किंमतीमध्ये असलेली तफावत मागील वर्षी आम्ही उजेडात आणली होती. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी रासायनिक खताचे दर अनुदान देऊन निश्चित केलेलं आहेत. सरकारच्या माध्यमातून देण्यात येणारे अनुदान आणि त्या खताची मुळ किंमत याच्या बाबत खताच्या पिशवीवर ठळक अक्षरात लिहिलेले असून सुद्धा खत विक्री करणारे व्यवसायिक आपल्याला पाहिजे ते दर लावून शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचीबाब मागील वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात उजेडात आणली होती. मात्र ऑगस्ट महिन्याच्या अगोदरच खताची वाढीव दराने विक्री झाल्यामुळे आमच्या सारख्या कित्येक शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती. त्यामुळे यावर्षीचा खत विक्रीचा दर याबाबत आपण शेतकऱ्यांना आणि खत विक्रेता व्यवसायिक यांना आधीच निर्धारित करून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळावी. रासायनिक खतांच्या विक्री दराबाबत चालू असलेले प्रचलित कायदे यांची वेळप्रसंगी कठोर अंमलबजावणी करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी स्वागत नाटेकर यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली आहे.