पर्यटन विकासाच्या उच्चस्तरीय समितीमध्ये सतीश लळीत, बाबा मोंडकर, जितेंद्र पंडित

स्वदेश दर्शन २.०' योजनेखाली शासनाची समिती नियुक्त
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: December 09, 2023 13:31 PM
views 88  views

सिंधुदुर्गनगरी : केंद्र शासनाच्या 'स्वदेश दर्शन २.०' योजनेच्या प्रभावी अमलबजावणीसाठी राज्य सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 'डेस्टिनेशन मॅनेजमेंट कमिटी' (डिएमसी)ची स्थापना केली आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील या १७ सदस्यांच्या उच्चस्तरीय समितीमध्ये १४ शासकीय अधिकारी असुन त्यात अशासकीय सदस्य म्हणून कातळशिल्प संशोधक सतीश लळीत, पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णु उर्फ बाबा मोंडकर, सुंदरवाडी हेल्पलाईन फाऊंडेशनचे सचिव जितेंद्र पंडित यांचा समावेश करण्यात आला आहे. पर्यटन सचिव जयश्री भोज यांच्या स्वाक्षरीने हा आदेश जारी झाला आहे.           

केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या आदेशानुसार व 'स्वदेश दर्शन २.०' योजनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे. 'स्वदेश दर्शन २.०' योजनेच्या प्रभावी अमलबजावणीसाठी केंद्र व राज्य अशा दोन्ही स्तरांवर एक संनियंत्रण यंत्रणा तयार करण्यात आली आहे. यात केंद्रीय स्तरावर राष्ट्रीय सुकाणु समिती, केंद्रीय मंजुरी व संनियंत्रण समिती, तर राज्य स्तरावर राज्य सुकाणु समिती व जिल्हा स्तरावर 'डेस्टिनेशन मॅनेजमेंट कमिटी' अशी व्यवस्था तयार करण्यात आली आहे.            

राज्य सुकाणु समिती ही राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली काम करेल. जिल्हा स्तरावरील 'डेस्टिनेशन मॅनेजमेंट कमिटी' ही जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली काम करणार आहे. या समितीत जिल्हा पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामविकास), जिल्हा परिषद, कार्यकारी अभियंता (सा.बां), जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, कौशल्य विकास योजनेचे प्रमुख, पर्यटन संचालनालयाच्या कोकण विभागाचे उपसंचालक, पुरातत्व्‍ विभाग, मालवणचे संवर्धन सहायक, प्रादेशिक बंदर अधिकारी, रत्नागिरीचे विभागीय पर्यटन व्यवस्थापक, विभागीय वन अधिकारी, कांदळवन संरक्षण विभागाचे अधिकारी या शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असुन जिल्हा पर्यटन अधिकारी हे समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. या समितीवर पर्यटन उद्योगाशी संबंधित दोन उद्योजकांची आणि अन्य क्षेत्रातील तज्ञाची नियुक्ती करण्याची तरतूद आहे. त्यानुसार श्री. मोंडकर, श्री. पंडित व श्री. लळीत यांची नियुक्ती या समितीवर करण्यात आली आहे.   

केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने दि. ९ जानेवारी २०२३च्या आदेशानुसार 'स्वदेश दर्शन २.०' या योजनेत समग्र पर्यटन विकासासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड महाराष्ट्रातील पर्यटन डेस्टिनेशन म्हणुन केली आहे. या योजनेखाली सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होणार आहे. या योजनेच्या अमलबजावणीतील अडथळे ओळखुन त्यावर उपाययोजना करणे, पर्यटन विकासाशी निगडीत विविध शासकीय विभागांमध्ये समन्व्य घडवणे, स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना उत्तेजन देणे, अशा प्रकारची अनेक उद्दिष्टे या समितीची आहेत. 'स्वदेश दर्शन २.०' या योजनेचा सातत्याने आढावा घेण्याचे कामही ही समिती करणार आहे.