जिल्हयात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर पर्यंत 'स्वच्छता ही सेवा 223' उपक्रम..!

Edited by:
Published on: September 12, 2023 15:04 PM
views 103  views

सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हयात दिनांक 15 सप्टेंबर ते दिनांक 2 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत स्वच्छता ही सेवा 2023 उपक्रम राबविण्यात येणार आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागात हा उपक्रम राबविण्यात येणार असुन, जिल्हयातील सर्व ग्रामपंचायती मध्ये या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे आवाहन प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी  प्रजित नायर, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

"स्वच्छता ही सेवा 2023" ची संकल्पना " कचरा मुक्त भारत" ही असणार आहे. यामध्ये दृष्यमान स्वच्छता व सफाई मित्र कल्याण यावरती लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यावर्षी स्वच्छतेचे उपक्रम राबविणे आवश्यक असून यामध्ये स्वयंस्फुर्तीने श्रमदान करणे गरजेचे आहे. या अभियानात ग्रामीण भागातील बसस्थानके, पर्यटन स्थळे, वारसा स्थळे, नदी किनारे, घाट, नाले आदी ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविली जाणार आहे. तसेच सिंगल युज प्लास्टीक (SUP) वापर व दुष्यपरिणाम याबाबत गावांमध्ये जनजागृती करणे, शालेय स्तरावर स्वच्छता मोहिम यांचे आयोजन करणे, ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण, कच-यातुन उत्पन्न घेणे, बाजारपेठा व सार्वजनिक ठिकाणी भिंती चित्रे काढणे व कचरा वर्गीकरण पेटया ठेवणे यासारखे उपक्रम राबविणेत येणार आहेत. स्वच्छतेसाठी युवकांच्या कृतीला चालना देण्यासाठी युवकांच्या नेतृत्वाखाली सर्व गटांना एकत्रित करुन स्वच्छतेचे उपक्रम राबविणेत येणार आहेत.

केंद्रीय मंत्री साधणार ऑनलाईन संवाद

जलशक्ती मंत्रालय व गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालय नवी दिल्ली यांच्या हस्ते 15 सप्टेंबर 2023 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे स्वच्छता ही सेवा 2023 उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यावेळी ते संवाद कार्यक्रमाव्दारे सरपंच, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, तसेच शहरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचे इतर अधिकारी यांच्याशी संवाद साधणार आहेत.