मोर्ले पारगड ग्रामस्थांचं आश्वासनाअंती उपोषण स्थगित !

Edited by: संदीप देसाई
Published on: February 21, 2024 06:17 AM
views 101  views

दोडामार्ग :  गेल्या चार वर्षापासून बंद असलेल्या मोर्ले-पारगड रस्त्याचे काम तात्काळ सुरू व्हावे या मागणीसाठी पुन्हा एकदा मोर्ले पारगड ग्रामस्थांनी  मंगळवारी येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडले. माजी आमदार राजन तेली यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम  व वनविभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन यावर तोडगा काढू या दिलेल्या आश्वासनाअंती हे उपोषण सायंकाळी उशिरा मागे घेण्यात आले. 

       दोडामार्ग व कोल्हापूरला जोडणारा मोर्ले-पारगड हा मंजूर होऊनही शासनाच्या आडकाटी धोरणामुळे किंबहुना वन व बांधकाम च्या भांडणात रखडला आहे. तो तातडीने पूर्ण व्हावा अशी प्राथमिक मागणी ग्रामस्थांची आहे. या रस्त्याच्या कामास सुरुवात झाली अन् काही प्रमाणात कामही झाले. मात्र मागील चार वर्षांपासून या रस्त्याचे काम बंद आहे. निधी आहे पण वनखात्याने वन हद्दीत काम करण्यास दिलेली मुदत संपल्याने ते रस्ता काम रखडले आहे. बांधकाम ने पुन्हा मुदत वाढ मागणे आवश्यक होते. मात्र तसे झालं नाही  या दोन खात्यांच्या भांडणात  या रस्त्याचे काम रखडले असून ते सुरू करावे अशी मागणी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे केली होती. मात्र काम सुरू न झाल्याने इशारा दिल्या नुसार  ग्रामस्थांनी येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली. यावेळी रघुवीर शेलार, मोर्ले माजी सरपंच महादेव गवस, सुजाता गवस, माजी उपसरपंच पंकज गवस, ज्ञानेश्वर चिरमुरे, प्रकाश नाईक, हरीश गवस,  समीर खुटवळकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

        बांधकाम उपविभागाचे  अधिकारी विजय चव्हाण हे उपोषण स्थळी दाखल झाले व त्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी उपोषणकर्त्यांनी श्री. चव्हाण यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत त्यांना धारेवर धरले. तुम्हाला जर आमच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देता येत नसतील तर तुमच्या वरिष्ठांना या ठिकाणी पाठवा असे सुनावले. मंजूर काम पूर्ण करण्याची जबाबदारी जर तुमच्या विभागाची असेल तर ते काम करण्यास तुम्ही टाळाटाळ का करता? असा सवालही उपस्थित केला. ठेकेदार जर काम करत नसतील तर त्यावर काय कारवाई केलात. रस्त्याच्या मोऱ्या, रस्ते झाले म्हणता पण आपण वस्तुस्थिती पाहिली आहे का. शिवकालीन पारगड किल्ल्याला जोडणाऱ्या या रस्त्याचे काम जलद गतीने पूर्ण होणे आवश्यक असताना यात दिरंगाई करण्यात आली. आज वर ४० हून अधिक आंदोलन झाली मात्र काम अपूर्णच असल्याने आज पुन्हा उपोषण झालं. 

       या उपोषणाला माजी आमदार राजन तेली यांनी सायंकाळी ४  उपोषणकर्त्यांची भेट घेत चर्चा केली. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम विभाग व वन विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन  दिले. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी हे उपोषण मागे घेण्यात आले.