भ्रष्ट प्रशासनाला पालकमंत्र्यांचे अभय

युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांचा आरोप
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 06, 2025 18:54 PM
views 214  views

वैभववाडी : जिल्ह्यातील ज्या अधिकारी व कर्मचारी यांच्याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी विविध तक्रारी केल्या आहेत अशांच्या जिल्हांर्तगत बदल्या केल्या जात आहेत. बदल्या करून त्या कर्मचाऱ्यांवरील कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. भ्रष्ट कर्मचाऱ्यांना जिल्ह्याचे प्रशासन पाठीशी घालत आहे. या प्रशासनाला पालकमंत्र्यांचेही अभय आहे असा आरोप ठाकरे युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी केला. येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी माजी सभापती लक्ष्मण रावराणे, नगरसेवक मनोज सावंत, रोहित पावसकर,दिपक पवार आदी उपस्थित होते.

नाईक म्हणाले, जिल्ह्यात सध्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये काही अधिकारी व कर्मचारी यांच्याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारी होत्या, अशांच्या बदल्या केल्या जात आहेत. यामध्ये वैभववाडी तालुक्यातील ग्रामपंचायत विस्तार अधिकारी लक्ष्मण हांडे व ग्रामसेविका सविता काळे यांचा सहभाग आहे. या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या विरोधात अनेकांच्या तक्रारी आहेत. मात्र, श्रीमती काळे यांची जिल्हातर्गत तर हांडे यांची जिल्ह्यातील अन्य तालुक्यात बदली झाली आहे. ही स़पुर्ण बदली प्रक्रिया संशयास्पद आहे. प्रशासनाने समझोता करून ही प्रक्रिया राबविली आहे. तक्रारी असलेल्या कर्मचाऱ्यावरील कारवाई टाळण्यासाठी ही पळवाट प्रशासनाने काढली आहे. त्यात पालकमंत्री यांचाही सहभाग आहे असा आरोप नाईक यांनी केला आहे.

एकीकडे जिल्ह्यात ४३२ग्रामपंचायती  सद्यस्थितीत ३१७ ग्रामसेवक उपलब्ध आहेत.जिल्ह्यात ग्रामसेवकांच्या ११५ जागा रिक्त आहेत.त्याचा थेट परिणाम गावच्या विकासावर होणार आहे.अशी परिस्थिती असतानाही कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त कसे केले जाते असा सवाल श्री नाईक यांनी केला.पालकमंत्री पदाची सुत्रे हातात घेतल्यावर श्री राणेंनी जिल्ह्यात अवैध धंदे, अवैध व्यवसाय चालू देणार नाही असं आश्वासीत केले होते.मात्र सध्या हे सर्व धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.यात पालकमंत्री यांनी समझोता केला आहे.यातूनच ते राज्यात आपली वेगळी छबी निर्माण करीत आहेत असा आरोप श्री नाईक यांनी केला.

पालकमंत्र्यांच्या तक्रारीचीही प्रशासनाकडून दखल नाही..

वैभववाडी तालुक्यातील हांडे दांपत्यांयाविरोधात येथील सामाजिक कार्यकर्त्यांने मागील वर्षी प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती.प्रशासन दखल घेत नसल्याने तत्कालीन आमदार व विद्यमान पालकमंत्री नितेश राणेंकडे संबंधित तक्रारदाराने निवेदन दिले होते.त्यानंतर नितेश राणे यांनी प्रशासनाला त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत पत्र दिले होते.या घटनेला एक वर्ष उलटले तरी अद्याप त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली नाही.आम नितेश राणेंच्या पत्रालाही प्रशासनाने किंमत दिली नाही हे पुराव्यानिशी श्री नाईक यांनी पत्रकार परिषदेत उघड केले.