
कणकवली : भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रामुळे नितेश राणे हे पालकमंत्री म्हणून निष्क्रिय ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप पक्षाचा पालकमंत्री असताना त्याच पक्षाचे कार्यकर्ते फुटतात, यावरून पालकमंत्रीपद सांभाळण्याची नितेश राणे यांची क्षमता नाही, अशी टीका शिवसेना उबाठा पक्षाच्या युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली आहे.
नाईक यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, शिंदे गटाकडून आमिषे दाखवून प्रवेश होत असल्याचा आरोप प्रभाकर सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केला. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यापूर्वी सावंत यांनी पालकमंत्र्यांना त्यांनी विरोधी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ‘भाजपमध्ये या व निधी मिळवा’ या आश्वासनाची ओळख करून द्यायची गरज होती. भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र व्यवहार करून तक्रार केल्यामुळे नितेश राणे यांची पालकमंत्री पद सांभळण्याची कार्यक्षमता नाही, असे स्पष्ट होते.
नितेश राणे यांनी यापूर्वी अनेकदा विरोधी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना खोटी आश्वासने दिली व त्यांचे फसवून भाजपामध्ये प्रवेश घेतले. परंतु हे प्रवेश करणारे कार्यकर्ते आता समजून चुकले की पालकमंत्र्यांकडून विकासाला न्याय मिळू शकत नाही. म्हणूनच त्यांनी प्रवेश करण्याचा सपाटा लावला आहे. शिंदे गटात देखील या कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास होणार असून शिंदे गटाला आपण जुमानत नसल्याचे सुद्धा पालकमंत्र्यांनी नुकतेच विधान केले आहे. हे प्रवेश करणारे कार्यकर्ते देखील कुठल्या एका विचारधारेचे नसून फक्त ठेकेदारीकरता हे प्रवेश होत आहेत हे सिद्ध झाले आहे, असेही नाईक यांनी म्हटले आहे.
मुळात जिल्ह्यात भाजप पक्ष हा नव्हताच. जिल्ह्यात भाजपने स्वत:चा कार्यकर्ता तयार केला नाही. विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना खोटी आश्वासने देऊन भाजपने आपला पक्ष मोठा केलेला आहे. शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी याआधी उबाठा गटाचे पक्षप्रवेश दाखवले होते, ते सर्व भाजपचेच कार्यकर्ते होते, हे यावरून सिद्ध होते. पालकमंत्री राणे यांनी कणकवली मतदारसंघात इतर पक्षांतील कार्यकर्त्यांना खोटी आश्वासने देऊन भाजपमध्ये प्रवेश दिला. मात्र, भाजपमध्ये जाऊन भ्रमनिरास झाला आहे, असेही नाईक यांनी म्हटले आहे.