कणकवली शहरातील टी पी स्कीम योजनेची नोटीस जारी

Edited by: उमेश बुचडे
Published on: December 09, 2023 20:57 PM
views 507  views

कणकवली : कणकवली नगरपंचायतच्यामार्फत नगर रचना योजना (टी. पी. स्कीम) मंजूर करण्यात आली असून त्याची नोटीस नुकतीच ०८/१२/२०२३ एक  वृत्तपत्र मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नोटीसद्वारे कणकवली शहरातील सलग २० हेक्टर जमीन संमती पत्राद्वारे नगरपंचायत ला दिल्यास या जमिनीमध्ये  प्लॉटिंग,रस्ते, गटार या छोट्या शहरांसारख्या वेगवेगळ्या सोयी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. शहरात हि योजना मंजूर झाली म्हणजे कणकवली शहराचा शहर विकास आराखडा मंजूर झाल्याचे हे उदाहरण असून सत्ताधारी आमदार नितेश राणे व जमिनीची दलाली करणाऱ्या  त्यांच्या निकटवर्तीयांच्या माध्यमातून कणकवली शहरवासीयांना अंधारात ठेवून शहर विकास आराखडा करण्यात आला आहे.कणकवली  शहर वासियांना यांची कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही, हा मनमानी कारभार आहे  असा आरोप युवासेना जिल्हाप्रमुख तथा कणकवली नगरपंचायतचे  माजी गटनेते सुशांत नाईक यांनी केला आहे.

सुशांत नाईक पुढे म्हणाले, कणकवली शहरात नगर रचना योजना (टी. पी. स्कीम) मंजूर झाली याचा अर्थ कणकवली शहर विकास आराखडा अंतिम झाला आहे.  कणकवली शहरवासीयांसाठी हा आराखडा खुला करण्याची आवश्यकता असताना देखील  सत्ताधारी आमदारांच्या दबावाखाली हा आराखडा लपवून ठेवण्यात आला आहे. कणकवली शहरातील सलग २० हेक्टर जमीन या योजनेअंतर्गत घेतली जाणार असून ही  नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांत याकरिता जमीन मालकांनी प्रस्ताव द्यावयाचे आहेत.  या प्रस्तावामध्ये सलग 20 हेक्टर जमीन व ७०  ते ८०  टक्के लोकांची संमती असणे आवश्यक आहे. शहरात सोयी सुविधा देण्याकरिता  केंद्र शासनामार्फत  कणकवली नगरपंचायतला बिनव्याजी कर्ज मिळणार असून पन्नास वर्षाकरिता हे कर्ज असणार आहे. मात्र एकीकडे कणकवली शहराच्या  शहर विकास आराखड्याचा डीपी प्लान प्रलंबित असल्याचे भासवले जात आहे तर  दुसरीकडे कणकवली शहरात नगर रचना योजना (टी. पी. स्कीम) राबविण्याची नोटीस काढली आहे. सत्ताधारी आमदार नितेश राणे व त्यांचेच काही जमिनीचे दलाल पडद्यामागून या सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी असल्याचा आरोप सुशांत नाईक यांनी केला आहे. याबाबत मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन कणकवली शहर विकास आराखडा हा जनतेसाठी खुला करण्याची  मागणी आपण  करणार आहोत. आणि जर येत्या काळात  शहर विकास आराखडा जनतेसाठी खुला झाला नाही व सत्ताधारी आमदार नितेश राणेंसाठी प्रशासन काम करत असेल तर कणकवली शहरावर होणारा अन्याय खपवून घेतला नाही.  राज्यात व केंद्रात असलेल्या सत्तेचा गैरवापर करून आमदार नितेश राणे प्रशासनाला पुढे करत अशा प्रकारे कणकवली शहराच्या जनतेची दिशाभूल करत आहेत.

शहरवासीयांना अंधारात ठेवून शहर विकास आराखडा मंजूर करणे आम्ही खपवून घेणार नाही व जमिनीच्या दलालांसाठी शहरवासीयांची  फसवणुक केल्यास कणकवली शहर शिवसेना व युवासेनेमार्फत तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा सुशांत नाईक यांनी दिला आहे.