
कणकवली : प्रचंड निधी आणला, अनेक विकासकामे केल्याच्या बाता आमदार नितेश राणे यांच्याकडून मारल्या जात आहेत. प्रत्यक्षात आलेला विकास निधी हा टक्केवारीसाठी आणि राणेंचे खिसे भरण्यासाठी होता. त्यामुळे प्रचंड निधी येऊनही कणकवली शहर आणि मतदारसंघाचा अपेक्षित विकास झालेला नाही अशी टीका शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली.
कणकवली शहरातील बिजलीनगर येथे श्री.नाईक यांनी नागरिकांच्या भेटी घेत महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्य प्रचारासाठीची कॉर्नर सभा घेतली. त्यांच्यासोबत शिवसेना ठाकरे पक्षाच्या प्रतीक्षा साटम, मिनल म्हसकर, वनिता सामंत, माने काकी, अंकिता मोडक, उत्तम सुद्रिक, रवी भंडारे, लक्ष्मण हन्नीकोड आदी उपस्थित होते. श्री.नाईक म्हणाले, स्वत: खासदार आणि दोन मुलांना आमदार करून राणे आपली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपलीघराणेशाही निर्माण करू पाहत आहेत. या विधानसभा निवडणुकीत ही घराणेशाही कणकवलीतील मतदार निश्चितपणे संपवून टाकतील आणि संदेश पारकर यांना निश्चितपणे विजयी करतील. नाईक म्हणाले, कणकवली शहरासाठी राणेंना ठोस काहीही करता आलेले नाही. त्यामुळे दरवर्षी मे महिन्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. बिजलीनगर प्रभागात पूर्वी मिनी एमआयडीसी हाेती. यात अनेकांना रोजगार संधी मिळाल्या होत्या. राणे राज्याचे मुख्यमंत्री झाले, केंद्रात उद्योगमंत्री झाले.
मात्र कणकवलीतील मिनी एमआयडीसी ते सुरू करू शकलेले नाहीत. तर आमदार नितेश राणे यांनी आठशे कोटींचा कचरा प्रकल्प आणला. पण हा प्रकल्प सुरूच होऊ शकला नाही. उलट या प्रकल्पासाठी नगरपंचायतीने आपली जागा त्या कंपनीला गहाण दिली असून ही जागा अद्यापही सत्ताधाऱ्यांना सोडवता आलेली नाही.