
सावंतवाडी : आरोग्यदृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असुविधांबाबत सर्वस्तरातून तक्रारीचा सुर आहे. लोकप्रतिनिधींकडे याबाबत लक्ष वेधलं जातं आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांनी उप जिल्हा रुग्णालयांना सरप्राईज व्हिझीट देत इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. कणकवली नंतर आता सावंतवाडीत त्यांनी भेट दिली.
गुरुवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ श्रीपाद पाटील व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सुबोध इंगळे यांनी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे अचानक भेट दिली. प्रत्येक विभागात व्यक्तिशः जाऊन रुग्णांशी संवाद साधत मिळत असलेल्या सोयी सुविधांची माहिती घेतली. बाह्यरुग्ण विभागाशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सकाळी साडेआठ वाजता उपस्थित राहण्यास सांगितले. एकस्रे, सीटीसस्कॅन, अपघात विभाग, अंतररुग्ण विभागात भेट देऊन रुग्णांना मिळत असलेल्या सोयी सुविधांची माहिती प्रत्यक्ष रुग्णशी संवाद साधून घेतली. सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी शासकीय गणवेशात व ओळखपत्र परिधान करून कामावर राहण्याच्या सूचना दिल्या. स्वच्छतागृहांची स्वच्छता पहिली व उपजिल्हा रुग्णालयातील विविध विभागांचा आढावा घेतला. गोरगरीब गरजू रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा देण्याच्या सूचना दिल्यात. तसेच गैरहजर असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर कार्यवाही करण्यास आदेश दिले.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ गिरीशकुमार चौगुले, डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, डॉ. पांडुरंग वजराठकर, डॉ. देसाई, डॉ. निखिल अवधूत, डॉ. जाधव आदींसह परिचारिका व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते. दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या वैद्यकीय सुविधांचा अभाव व रिक्त पदांची पुर्तता करावी अशी मागणी उपस्थितांनी शल्य चिकित्सक यांना केली.