कारिवडे गावचे सुपुत्र सुभेदार सुनील सावंत शहीद...!

Edited by: विनायक गावस
Published on: September 14, 2023 11:13 AM
views 16923  views

सावंतवाडी : १९ मराठा लाईट इन्फंट्री बटालियनचे  सुभेदार सुनील राघोबा सावंत (४५, रा. कारिवडे) हे बुधवारी सकाळी पिटी परेडदरम्यान पंजाब येथे शहीद झाले. त्यांचे पार्थिव दोन दिवसात पंजाब येथून गावी आणण्यात येणार आहे. या घटनेने कारिवडे गावावर शोककळा पसरली आहे. नेहमीप्रमाणे पंजाब येथे त्यांच्या युनिटमधील जवानांची परेड सुरू होती. त्यावेळी धावताना सुभेदार सावंत चक्कर येऊन खाली पडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पंजाब १९ मराठा युनिटमधून सावंत यांच्या घरी कारिवडे भैरववाडी येथे या घटनेची कल्पना देण्यात आली आहे.

सुभेदार सुनील सावंत हे गेल्याच महिन्यात एक महिन्याच्या सुट्टीवर येऊन ३० ऑगस्टला पुन्हा पंजाब येथे ड्युटीवर गेले होते. सैन्यदलात त्यांची २६ वर्षे सेवा झाली आहे. कारिवडे गावात त्यांनी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते सैन्य दलात मराठा बटालियनमध्ये भरती झाले होते. गावातील सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी सहभाग असायचा. गेल्या महिन्यात ते एक महिन्याच्या सुट्टीवर गावी आले होते. ३० ऑगस्टला सुट्टी संपवून ते आपल्या युनिटला जॉईन झाले होते.

त्यांचे वडील राघोबा सावंत हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव पंजाब येथून मूळ गावी दोन दिवसात आणले जाणार आहे, असे रत्नागिरी जिल्हा सैनिक कल्याण विभागाचे गवळी यांनी सांगितले. सुनील यांचे चुलत भाऊ माजी सैनिक सुभेदार मेजर लक्ष्मण सावंत व सामाजिक कार्यकर्ते आनंद तळवणेकर यांनी सुभेदार सुनील सावंत यांना श्रद्धांजली वाहिली.