
मालवण : लाईफ इन्शुरन्स एजंटस् फेडरेशन (लिआफी) डिव्हिजनल कौन्सिल कोल्हापूर यांच्यावतीने रविवारी दि २५ जानेवारी रोजी मालवण येथे कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील विमा प्रतिनिधींसाठी कोकण स्नेहमेळावा व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती कोल्हापूर डिव्हिजनल कौन्सिलचे अध्यक्ष किरण कटके व जनरल सेक्रेटरी प्रसाद सपकाळे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.
हा मेळावा रविवार दि.२५ रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन या वेळेत मालवण येथील अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूलच्या पटांगणावर घेण्यात येणार आहे.
सकाळी साडेदहा वाजता मेळाव्याचे उद्घाटन करण्यात येणार असून यावेळी लिआफी संघटनेच्या कामकाजा संदर्भात वरीष्ठ नेतेमंडळींचे मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी लिआफीचे वेस्टर्न झोनल कौन्सिलचे अध्यक्ष सुधीर पाध्ये मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून संघटनेच्या राष्ट्रीय स्तरावरील कामकाज संदर्भात मार्गदर्शन करतील.
विमा क्षेत्रात काम करताना विमा प्रतिनिधींना येणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी आणि त्यांच्या ज्ञानात व कौशल्यात भर घालण्यासाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रमुख वक्ते म्हणून नामवंत फायनान्शिअल कोच आणि 'इन्स्ट्रासॉफ्ट सोल्युशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) रंजन नागरकट्टे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.तब्बल तीन तासांच्या विमा प्रतिनिधीसाठींच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये प्रामुख्याने विमा विक्रीतील अडचणी व त्यावरील उपाय, भविष्यातील विमा क्षेत्रातील बदल, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक घडामोडींचे परिणाम, मोठ्या रकमेचा विमा (HNI) कसा करावा आणि विमा विक्रीचे सोपे मार्ग या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी कोल्हापूर डिव्हिजन कौन्सिलचे माजी अध्यक्ष शरद हुक्केरी व कार्याध्यक्ष एम डी पाटील, पतसंस्थेचे व्यवस्थापक अतुल पाटील,मालवण शाखेचे पदाधिकारी विठ्ठल साळगांवकर,अजय मयेकर व पुजा करलकर, जगदीश खराडे, संतोष मयेकर आदी संयोजन करीत आहेत. त्यांना आजी माजी पदाधिकारी, डिव्हीजन कौन्सिलचे सर्व सदस्य, मालवण शाखेचे सर्व पदाधिकारी, सर्व शाखाध्यक्ष, पदाधिकारी व विमा प्रतिनिधी सक्रिय सहकार्य करीत आहेत. तरी कोल्हापूर जिल्ह्यासह कोकण विभागातील जास्तीत जास्त विमा प्रतिनिधींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन लिआफी फेडरेशनच्या वतीने करण्यात आले आहे.










