कणकवलीत मांडवी एक्सप्रेसखाली उडी मारून महिलेची आत्महत्या !

Edited by: उमेश बुचडे
Published on: November 11, 2023 18:03 PM
views 2243  views

कणकवली : चिंदर पालकरवाडी येथील माधवी मधुकर पाटणकर (६२) या महिलेने चक्क कणकवली रेल्वेस्टेशन येथे प्लॅटफॉर्मवर लागत असलेल्या मांडवी एक्सप्रेसखाली उडी मारून आत्महत्या केली. शनिवारी दुपारी ११.४८ वा. सुमारास घडलेल्या या घटनेमुळे रेल्वेस्टेशन कर्मचारी व प्रवासी वर्गात एकच खळबळ उडाली होती. माधवी यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.


माधवी बराचवेळ कणकवली रेल्वेस्टेशन येथे ६ क्रमांकाच्या बोगीच्या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर थांबल्या होत्या. मुंबईकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस कणकवली स्थानकावर येण्याची घोषणा झाली तेव्हा माधवी उठून प्लॅटफॉर्मच्या रेल्वे उभी होण्याच्या कडेला आल्या. मांडवी एक्सप्रेस कणकवली स्थानकाकडे येताना मंद झाली व हळूहळू थांबण्याच्या बेतात होती. नेमक्या याचवेळी माधवी यांनी प्लॅटफॉर्मवरून खाली उतरत रेल्वेखाली स्वत:ला झोकून दिले.


घटनेची माहिती समजताच रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक राजेश सुरवाडे, सहाय्यक उपनिरीक्षक विनोद पाटील, कॉन्स्टेबल युवराज पाटील, गणेश खोंद्रे, सनानसे राधेश्याम, विपुल म्हस्के आदींनी घटनास्थळी धाव घेतली. कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव, उपनिरीक्षक शरद देठे, पोलीस नाईक चंद्रकांत माने, रुपेश गुरव आदीही घटनास्थळी दाखल झाले. पाहणीअंती मृतदेहाचे कमरेपासून दोन भाग झाले होते. रेल्वे सुरक्षा बल व कणकवली पोलीस यांनी मृतदेह प्लॅटफॉर्मवर आणला. पुढे मृतदेह विच्छेदनासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला होता.