सावंतवाडी रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी सुहास सातोस्कर

इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी रिया रेडीज
Edited by: विनायक गावस
Published on: July 08, 2023 18:57 PM
views 104  views

सावंतवाडी : सावंतवाडी रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी सुहास सातोस्कर तर इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी रिया रेडीज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. रोटरी क्लब सचिव म्हणून प्रविण परब तर खजिनदार म्हणून भालचंद्र उर्फ आबा कशाळीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सावंतवाडी इनरव्हीलच्या सचिवपदी निना जोशी तर खजिनदार पदी श्रेया नाईक, आयएसओ नेत्रा सावंत, इडिटर पुजा पोकळे यांची निवड झाली आहे. 


दरम्यान, येत्या काळात रोटरी इंटरनॅशनल क्लबच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागात २०० गरजूंना प्रत्येकी ३० हजार रुपये खर्चाचा बायोगॅस प्रकल्प फक्त ४ हजारात बांधून देण्यात येणार आहे. त्यातील २० प्रकल्पांची उभारणी सावंतवाडी 'रोटरी क्लब' करून देणार आहे. तसेच ग्रामीण व डोंगराळ भागात सोलर लॅम्प लावण्याचा मानस आहे अशी माहिती रोटरी क्लब सावंतवाडीचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुहास सातोस्कर यांनी दिली. तसेच इनरव्हील क्लबच्या माध्यमातून आरोग्य विषयक तसेच महिलांना सक्षम करणारे अनेक उपक्रम राबविले जाणार आहे. मुलांना इंटरनेटबद्दल माहिती देण्यासोबत कॅन्सर निदान सारखे कॅम्प आयोजित करण्यात येणार आहेत. जास्तीत-जास्त ग्रामीण भागात ही सुविधा पोहोचविण्यात येणार आहे अस मत इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ. रिया रेडीज यांनी व्यक्त केले.


यावर्षी वेगवेगळे उपक्रम राबविले जाणार आहेत. यात जिल्ह्यातील २०० बायोगॅस प्रकल्प गरजूंना फक्त ४ हजार रुपयात बांधून देणार आहोत. ज्या गरजूंना त्याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा. त्याच बरोबर नेत्र तपासणी शिबीर, रक्त तपासणी, कान, दात, रक्तगट तपासणी यासह रक्तदान शिबीर, झाडे लावणे, स्वच्छता अभियान, कापडी पिशव्यांचे वाटप आदी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. नामवंत वक्त्यांना बोलावून या ठिकाणी करिअर मार्गदर्शन शिबीर घेण्यात येणार असून स्पर्धा परिक्षांसाठी येथील विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागात सोलर लॅम्प उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कारागृहात कैद्यांसाठी आध्यात्मिकवृत्ती जोपासली जावी म्हणून प्रवचन व कीर्तन केले जाणार आहे. कारागृहाचे अधिकारी संधी उपलब्ध करून देतील तेथे उपक्रम हाती घेतला जाणार आहे. एक विद्यार्थी, एक झाड लावण्यात येईल. स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी कापडी पिशव्यांना प्राधान्य दिले जाईल. मोबाईल पासून मुलांना दूर ठेवण्यासाठी बुध्दिबळ सह खेळ आयोजित करण्यात येतील. विधवा व घटस्फोटीत महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती, किफायतशीर शेती मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असं मत श्री. सातोस्कर यांनी व्यक्त केले. तर इनरव्हीलच्या सौ. रिया रेडीज म्हणाल्या, भविष्यात विविध आरोग्य विषयक उपक्रमा सोबत स्वच्छता अभियान, महिला सबलीकरण करण्यासाठी विविध उपक्रम वृक्षारोपण, कॅन्सर निदान शिबीर घेण्यात येणार आहे. या उपक्रमांना सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.


याप्रसंगी रोटरी क्लब सावंतवाडीचे रो.अनंत उचगावकर, प्रमोद भागवत, सोमनाथ जिगजिन्नी, राजू पनवेलकर, राजेश रेडीज, सत्यजित धारणकर, राजन हावळ, सुबोध शेलटकर, अँड. सायली दुभाषी, बाबल्या दुभाषी, नेत्रा सावंत, पुजा पोकळे आदी उपस्थित होते.