दोडामार्गातील धाटवाडीत पोलिसांचं अचानक सर्च ऑपरेशन

Edited by: लवू परब
Published on: January 15, 2025 18:11 PM
views 261  views

दोडामार्ग : दोडामार्ग शहरात वास्तव्यास असलेले परप्रांतीय बांगलादेशी आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी मंगळवारी रात्री क्राईम ब्रांच पथक व दोडामार्ग पोलिसांनी अचानक सर्च ओप्रेशन केले. यात दोडामार्ग धाटवाडी येथील एकूण 60 परप्रांतीयाची आधार कार्ड घेऊन झाडाझडती घेतली. यात सर्व परप्रांतीय हे वेस्ट बंगाल चे असल्याचे निदर्शनास आले. यात बांगलादेशी नव्हते. मात्र वास्तव्यास असलेल्या भाडेकरूंबाबत सविस्तर माहिती येत्या दोन दिवसात पोलीस ठाण्यात न दिल्यास त्यांना थारा देणाऱ्या घरमालकावर थेट गुन्हे दाखल करणार असल्याची तंबीच दोडामार्ग  पोलिसांनी दिली. 

 याबाबत अधिक माहिती अशी की, दोडामार्ग शहरात दिवसेंदिवस परप्रांतीयांचे वास्तव्य वाढत असल्याच्या तसेच त्यामुळे शहरात गुन्हेगारी देखील वाढत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग पोलिसांनी देखील शहरातील सर्व घर मालक तसेच त्यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहत असलेल्या विशेषत: परप्रांतीयांना दोडामार्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्याच्या सूचना यापूर्वीच केल्या आहेत. मात्र अद्यापही बऱ्याच जणांनी आपल्या भाडेकरू व्यक्तींची माहिती किंवा आधार कार्ड पोलीस स्थानकात दिली नाही.  यावेळी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी आक्रमक भूमिका घेत मंगळवारी रात्री एलसिबि यांच्या समवेत सर्च ऑपरेशन केले यावेळी दोडामार्ग शहरातील खालची धाटवाडी येथील सर्व भाडेकरू व त्यांचे घरमालक यांना चांगलीच तंबी देत दोन दिवसात संबंधित भाडे करू यांच्या भाडे करार व त्यांचे आधार कार्ड पोलीस स्थानकात जमा करा अन्यथा घर मालकांवरच गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगितले. यावेळी दोडामार्ग पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, पोलीस हवालदार विठोबा सावंत, राजेश गवस यांसह गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक सुधीर सावंत, सहाय्यक पोलीस फौजदार सुरेश राठोड, पोलीस हवालदार प्रमोद काळसेकर अनुपकुमार खंडे, आशिष गंगावणे, पोलीस नाईक अमित पालकर आदी उपस्थित होते.


धाटवाडी परिसरात अचानक सर्च ऑपरेशन 

त्या अनुषंगाने शहरात कोठे बांगलादेशी लपले आहेत का? याबाबत सिंधुदुर्ग पोलीस दलातील क्राइम ब्रांच अर्थात गुन्हा अन्वेषण विभाग व दोडामार्ग पोलीस यांनी शहरातील आयी रोड - प्राथमिक शाळा परिसरात सर्च ऑपरेशन केले. खालची धाटवाडी या ठिकाणी काल मंगळवारी रात्री उशिरा अचानक सुरू झालेल्या या कार्यवाहीने संबंधित परप्रांतीय व घरमालक यांची अक्षरशः तारांबळ उडाली होती. येथे भाडेकरु म्हणुन राहत असलेल्या तब्बल ६० जणांची या पोलीस पथकाने कसून चौकशी केली. त्यांचे आधारकार्ड तसेच अन्य वास्तव्याचे पुरावे घेऊन चौकशी करून व्यवस्थित चाचपणी या पोलीस पथकाने केली. संबधित व्यक्तींची आधारकार्ड च्या वेबसाईट वर आधार नंबर घालून संबधित व्यक्तीं कोणत्या राज्यातील आहेत याबाबतची तपासणी केली. या तपासणी दरम्यान कोणीही बांगलादेशी नसल्याचे व भारतातील अनेक भागातील सेंट्रींग कामगार, विहीर बांधणी कामगार वगैरे असल्याचे निष्पन्न झाले.

घर मालकांवर गुन्हे दाखल करणार : पोलीस निरीक्षक 

दोडामार्ग शहरात विशेषतः परप्रांतीय जे भाडेकरु म्हणून वास्तव्यास आहेत त्यांनी व त्यांच्या मालकांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात त्या संदर्भात सविस्तर नोंद करण्याचे आवाहन यापूर्वीच करण्यात आले आहे. मात्र अजूनही बरेच भाडेकरू व घरमालक या सूचनेकडे दुर्लक्ष करत आहेत. आज सर्च ऑपरेशन केलेल्या या भाडेकरू संदर्भात येत्या दोन दिवसात नोंद न केल्यास संबंधित घर मालकांवर गुन्हे दाखल करणार असल्याची तंबी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली. तेव्हा अनेक घर मालकांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते.