कुडासेच्या 'सोहम'चा असाही प्रामाणिकपणा !

Edited by: संदीप देसाई
Published on: July 12, 2023 16:39 PM
views 338  views

दोडामार्ग : सहसा वाटेत सापडलेली वस्तू मूळ मालकापर्यंत कोणी नेऊन देत नाही, आणि एखाद्या चांगल्या कामांसाठी मिळालेलं बक्षीसही कोणी परत करत नाही, मात्र या दोन्ही गोष्टी सऱ्हास गंडा घालण्याच्या आजच्या जमान्यात सत्यात उतरवत दोडामार्ग तालुक्यातील कुडासे गावच्या बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांन समाजासमोर आणि तरुणाई समोर एक आदर्श घालून दिलाय. 

     कु. सोहम मधुकर देसाई असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो सरस्वती विद्या मंदीर व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स कुडासे येथे इयत्ता १२ वीत शिकत आहे. त्याला  कुडासे पणतुर्ली येथील बापू राणे यांचा महागड्या किंमतीचा मोबाईल पणतुर्ली- कुडासे-भेडशी असा प्रवास करताना सापडला होता.  हा महागडा चांगल्या कंपनीचा मोबाईल सापडल्यानंतर सोहमने आपल्या गावातील, वाडीवरील व्हॉटसअप ग्रुपवर मोबाईल बाबत पोस्ट टाकली.  कुणाचा मोबाईल असेल त्याने ओळख पटवून घेऊन जावा असा संदेश व्हॉटसप, फेसबुक द्वारे केला. त्यानंतर तो संदेश बापु राणे यांच्या पर्यंत पोहचला. आपला मोबाईल कुडासे गावातीलच एका व्यक्तीला सापडल्याचे समजताच त्यांनी सोहमशी संपर्क केला. तसेच सदर मोबाईल त्यांचाच आहे याची खात्री झाल्यानंतर त्यांना तो परत केला. 

     त्यानंतर बापू राणे यानी सोहम याने आपला मोबाइल परत केल्याबद्दल त्याला बक्षीस देण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र सोहमने आपणास काहीही बक्षीस नको तुमचा मोबाईल तुम्हाला परत मिळाल्या यातच आपल्याला आनंद झाल्याचे सांगत बक्षीस नाकारले. मात्र इतक्या प्रामाणिक पणे सोहमने आपला मोबाईल परत केल्याने बापू राणे यांना त्याला बक्षीस द्यायचेच होते. त्यामुळे न रहाहून त्यांनी अखेर सोहम यास रोख ५ हजरांच बक्षीस दीले.

    मात्र सोहमने त्याहिपुढे जात त्याला मिळालेली बक्षीस रक्कम ५ हजार रुपये आपण ज्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेला देण्याचा आदर्श निर्णय घेतला. याबाबत आपले आई - वडील, काका - काकी याना सांगितले. त्यामुळे कुटुंबातील सर्वानी त्याला हे चांगल  आदर्शवत काम असल्याचे सांगत त्याचे कौतुक केले. त्यानंतर सोहमने ती बक्षीस ५ हजार रु. रक्कम कुडासे नं.१ चे मुख्याध्यापक श्री. राठोड सर, श्री. पास्ते सर तसेच शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य यांच्या उपस्थित मुख्याध्यापकांकडे सूपूर्त केली. सोहमच्या या प्रामाणिक पणाबद्दल आणि त्यानंतर पुन्हा दाखवलेल्या दातृत्व भावनेबद्दल  सर्व स्तरातून कौतुक होत आहे.