विहिरीत पडलेल्या बिबट्याची यशस्वी सुटका..!

सावंतवाडी वन विभागाची यशस्वी मोहीम
Edited by: प्रतिनिधी
Published on: February 25, 2023 16:50 PM
views 233  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील साटेली गावातील खालचीवाडी भागातील आनंद सावंत यांच्या शेतातील विहिरीत काल रात्री पडलेल्या बिबट्याची वन विभागामार्फत यशस्वी सुटका करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

 सावंतवाडी वन विभागाला साटेली येथे विहिरीमध्ये बिबट्या पडला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सावंतवाडी वनपरिक्षेत्राचे शीघ्र कृती दल बिबट्याच्या सुटकेसाठी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जागेवर पाहणी केली असता बिबट्या पूर्णवाढ झालेला अंदाचे अडीच वर्षे वयाचा असल्याचे निदर्शनास आले. सदर बिबट्या रात्री 11 च्या दरम्यान भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडला असावा असे दिसून आले. बिबट्या विहिरीत पाईपच्या सहाय्याने लोंबकळत तग धरून राहिला होता. त्याला तरंगण्यासाठी तत्काळ लाकडाचा ओंडका विहिरीत सोडण्यात आला. त्यानंतर सदर बिबट्याचा त्या भागात अधिवास असल्या कारणाने त्याला विहिरीतून बाहेर येण्यासाठी शिडी व त्याला जोडलेल्या लाकडांचा आधार देऊन विहिरीत सोडण्यात आले. त्या शिडीचा आधार घेऊन बिबट्या विहिरीच्या बाहेर यशस्वीरीत्या बाहेर आला व त्याच्या नैसर्गिक अधिवासात निघून गेला. बिबट हा आपल्या जैवविविधतेतील सर्वोच्च भक्षक असून तो आपली जीवसृष्टी संतुलित करण्यात महत्वाची भूमिका बजावतो, म्हणुन या आपल्या कोकणातील ठेव्याचे जतन, संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आपल्या सर्व सिधुदुर्गवासीयांनी असेच मोलाचे सहकार्य करावे, असे आवाहन सावंतवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर यांनी केले आहे.

      या बचाव मोहिमेत उपवनसंरक्षक सावंतवाडी एस नवकिशोर रेड्डी, वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल नागेश खोराटे, आप्पासाहेब राठोड, संग्राम पाटील, प्रकाश रानगिरे, महादेव गेजगे, रेडकर भाऊ, पडते भाऊ, स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी बांधव यांनी मोलाचे सहकार्य केले.