महेश कांदळगावकर, यतीन खोत यांच्या पाठपुराव्याला यश | मेरिटाईम बोर्डाने 'हे' काम लावलं मार्गी

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 25, 2023 19:34 PM
views 145  views

मालवण : बंदर जेटीच्या ठिकाणी बाजारास येणाऱ्या व्यापाऱ्यांना, मालवाहकांना त्यांच्या गाड्यांसाठी पंधरा फुटाची वाट ठेवल्याने आता व्यापाऱ्यांना भेडसावणारी समस्या दूर झाली आहे. या कामासाठी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी मेरिटाईम बोर्डाकडे पाठपुरावा केला होता. हे काम मार्गी लागल्याने त्यांनी मालवण वासियांच्या वतीने मेरिटाईम बोर्डाचे आभार मानले आहेत.  

बंदर धक्का येथे मेरिटाईम बोर्डाच्यावतीने वाहनतळ तसेच काँक्रीट भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम करत असताना वाहनतळाकडून बाजारपेठ येथे जाण्यासाठी लहान वाट ठेवण्यात येणार होती. यामुळे बाजारपेठ येथे गाड्या घेऊन येणारे, त्याचप्रमाणे व्यापारी वर्गाच्या सामानाचे मालवाहक ट्रक यांना याठिकाणी येणे अशक्य होणार होते.  त्याचबरोबर या वाहनतळाच्या मधून  बाजारपेठ याठिकाणाहून येणारे पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी मोरी ठेवण्यात आली होती.

त्यामुळे बाजारपेठ येथील पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत होता. ही मोरी सुद्धा बदलून अन्य ठिकाणी नेण्यात येत होती. याबाबतची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी व्यापारी संघाच्या पदाधिकारी, अन्य व्यवसायिकांसह येथील बंदर कार्यालयात भेट देत संबंधित अधिकाऱ्यांची या समस्येकडे लक्ष वेधले. बाजारपेठ येथे जाण्यासाठी १५ फुटाची वाट ठेवण्याबाबत तसेच पाणी निचरा होण्यासाठी पूर्वीपासून असलेली वाट कायम ठेवण्याबाबत सूचना करण्यात आली. त्यानंतर या सूचनेची तात्काळ दखल मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी घेऊन प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली आणि व्यापारी, व्यवसायिकांनी केलेल्या सूचनेनुसार १५ फुटाची वाट आणि पूर्वीच्या ठिकाणी असलेली मोरीचे बांधकाम त्याचठिकाणी करून दिले. त्यामुळे व्यापारी वर्गाकडून तसेच मालवण वासीयांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. हे काम मार्गी लावल्याबद्दल मालवण वासियांच्यावतीने माजी नगराध्यक्ष श्री. कांदळगावकर, श्री. खोत यांनी मेरिटाईम बोर्डाचे आभार मानले.