
सावंतवाडी : दादर येथे ६ ऑगस्ट रोजी खेळविण्यात आलेल्या ५८ व्या महाराष्ट्र राज्य कुमार गट अजिंक्यपद कॅरम स्पर्धेमधे सिंधुदुर्गच्या केशर निर्गुण आणि दिक्षा चव्हाण यांनी अनुक्रमे २१ वर्षांखालील मुली व १८ वर्षांखालील मुलींच्या गटामधे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेमधे राज्यभरातील एकूण १७६ मुला मुलींनी सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यामधे केशरने ठाण्याच्या सखी दातारला तर दिक्षाने ठाण्याच्याच मधुरा देवळेला नमवत अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केली. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी या दोघींच्या कामगिरीचे कौतुक करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
ऑल इंडिया कॅरम फेडरेशनच्या २३ ते २६ सप्टेंबर २०२४ रोजी ग्वाल्हेर, मध्यप्रदेश येथे होणाऱ्या ४९ व्या कुमार गट कॅरम राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये या दोघीही महाराष्ट्र राज्यातर्फे आपापल्या वयोगटाचे कप्तानपद भुषवील. १२ ते १४ ऑगस्ट महाराष्ट्र कॅरम असोसिएशनची अनोखी आणि पहिलीवहिली रॅपिडो कॅरम सुपर सिक्स २०२४ ही स्पर्धा सुर्यवंशी क्षात्रैक्य ज्ञाती समाज हॉल, दादर येथे पार पडली. वरिष्ठ गटाच्या या स्पर्धेत टी२० क्रिकेट प्रमाणे गतिमान खेळासाठी ८ ऐवजी ६ बोर्डाचा गेम यासारख्या नविन फॉरमॅटमधे प्रथमच ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली.
सिंधुदुर्गच्या केशर निर्गुणने रिझर्व बँकेच्या अंबिका हरीतचा १९-०६, १९-०६ असा सरळ सेटमधे पराभव करत हा ऐतिहासिक विजय मिळवला. या स्पर्धेतील महिला गट विजेत्यासाठी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने जाहीर केलेले रोख रक्कम ३५,०००/- रुपयांचे इनामही पटकावले.यानंतर महाराष्ट्र कॅरम असोसिएशनची ५८ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व आंतर जिल्हा कॅरम स्पर्धा २०२४-२५ ही सेंट्रल रेल्वे इन्सिट्यूट हॉल, दादर येथे १५ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्याने पार पडली. यामधे थ्री वे टाय होऊन सेट पॉईंटमधे थोड्याशा फरकाने सिंधुदुर्ग महिला संघाचे ब्राँझ मेडल हुकले.
पण वैयक्तीक महिला गटामधे दिक्षा चव्हाणने चौथे तर केशर निर्गुणने पाचवे मानांकन प्राप्त करत सिंधुदूर्गची मान उंचावली. याच बरोबर राष्ट्रीय स्पर्धांसाठी महाराष्ट्राच्या संघात या दोघिनीही आपले स्थान बळकट केले. ही शुभवार्ता भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत याना समजल्यावर त्यानी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना ही माहिती दिली. तसेच भाजपा क्रीडा प्रकोष्ट जिल्हा संयोजक योगेश फणसळकर यांच्यामार्फत या दोनही राज्यविजेत्या सिंधुकन्यांना ओरोस येथे आमंत्रित केले. पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील अधिकारी वर्गाच्या समक्ष दोघींच्या कामगिरीचे कौतुक करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. आणि कॅरमच्या अधीक सरावासाठी दोघींनाही चॅम्पियन कॅरम बोर्डचा नवा कोरा सेट देखील दिला.जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि पालकमंत्री रविंद्र चव्हाण याना जिल्ह्यातील क्रीडा चळवळीबाबत असलेल्या आस्थेबाबत दोन्ही खेळाडूंचे पालक आणि खेळाडूंनी समाधान व्यक्त केले . केशर आणि दिक्षाच्या या फरफॉर्मन्स मुळे सिंधुदुर्ग कॅरम परिवार आनंदी आणि उत्साही झाला आहे. खेळाडू तसेच सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन तर्फे दोघिंवर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव केला जातो आहे.