गोवा हेरिटेज कुकिंग स्पर्धेत जयहिंद कॉलेजचं यश

Edited by: संदीप देसाई
Published on: August 24, 2024 12:46 PM
views 139  views

गोवा : जयहिंद कॉलेजचे प्राचार्य शेफ अमेय महाजन आणि शेफ शेफ टॅरी डिसा यांनी गोवा हेरिटेज कुकिंग स्पर्धेत "हेरिटेज मास्टर शेफ" हा पुरस्कार मिळविला आहे. याच स्पर्धेत कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीही चांगलं yash मिळवलंय. कॉलेजचे विद्यार्थी अंकित धुरी  आणि शुभम देसाई यांनी द्वितीय रनर उप क्रमांक पटकावला. गोवा हेरिटेज कुकिंग स्पर्धेचे आयोजन गोवा हॉस्पिटॅलिटी शो २०२४ च्या अंतर्गत डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम, पणजी गोवा येथे करण्यात आले होते.



हे दोन पुरस्कार मिळवून जयहिंद कॉलेजने आपला दर्जा आणि शिक्षणाची गुणवत्ता सिद्ध केली आहे. या स्पर्धेचे परीक्षण अंजली वालावलकर, सुझेटी मार्टिन, सुनीता रोड्रिग्स आणि शेफ कुणाल अरोलकर यांनी केले. शेफ अमेय महाजन आणि शेफ टॅरी डिसा यांनी गोव्याचा सांस्कृतिक वारसा दर्शवणारा "पूर्वजांचो मोग" या नावाने गोव्याच्या पारंपरिक पदार्थांचे सादरीकरण केले. यात सुक्या माशांचा वापर, कोळंबी, फिश करी, कोळंबी करी, गोवन लोणचं, तीवळ, उकडो भात, तिसरे सुक्के, सान्ना, गोवन पोई, शिरवाळे आणि रस अशा असंख्य गोवन पारंपरिक पदार्थांचा समावेश होता. या पदार्थांनी सर्व उपस्थितांना आकर्षित केले.

या यशामुळे कॉलेजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ग्रामीण भागातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची क्षमता मोठ्या शहरातील विद्यार्थ्यांपेक्षा कमी नाही, हे आज सिद्ध झाले, असे मत लोकमान्यचे सीनियर एक्झिक्युटिव प्रवीण प्रभू केळुसकर  यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला हृषिकेश सुर्याजी, हर्षद धुरी आणि कॉलेजचे विद्यार्थीही बक्षीस वितरणावेळी उपस्थित होते.