
कणकवली : जिल्हास्तरीय शालेय स्क्वॉश स्पर्धेमध्ये अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्था संचलित बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली या प्रशालेतील 14 वर्षा आतील व 17 वर्षा आतील विद्यार्थिनींचे ओरोस येथे संपन्न झालेल्या जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग, द्वारा आयोजित जिल्हास्तरीय शालेय स्क्वॉश स्पर्धेमध्ये यश संपादन केले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन मा. खा. ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तसेच जिल्हा क्रीडाअधिकारी विद्या शिरस सिंधुदुर्ग जिल्हा स्क्वॉश असोसिएशन चे अध्यक्ष ॲड. विवेक राणे हे देखील उपस्थित होते. स्पर्धेला लाभलेले पंच व इतर क्रीडा शिक्षक यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेमध्ये प्रशालेतील एकूण पाच विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये १४ वर्षाखालील वयोगटात कु. तनिष्का संदीप सावंत ( इयत्ता ९वी) , १७ वर्षाखालील वयोगटात कु. सृष्टी मिलिंद राणे ( इयत्ता ९वी) , कु. रितिका लवेश खापेकर ( इयत्ता ९ वी), कु. प्रणाली किसन ठोंबरे ( इयत्ता १०वी) आणि कु. मधुरिमा माठेकर ( इयत्ता १०वी) यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. १४ वर्षाखालील मुली या वयोटात प्रथम क्रमांक प्राप्त करून तनिष्का सावंत या विद्यार्थिनीने प्रशालेचे नाव उच्च केले. त्याचबरोबर प्रणाली ठोंबरे हिने १७ वर्षाखालील मुली या वयोगटात द्वितीय क्रमांक प्राप्त करून विभागस्तरावर आपले स्थान निश्चित केले. त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थिनींनी उत्कृष्टरित्या खेळून आपले स्थान विभागस्तरावर प्राप्त केले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे व प्रशिक्षकाचे अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेच्या सचिव सुलेखा राणे , खजिनदार रमेश राणे, संस्था सदस्य संदीप सावंत, संस्थेच्या समन्वयक प्रणाली सावंत शाळेच्या मुख्याध्यापिका गीतांजली कुलकर्णी तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.